सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !
चित्रपटगृहमालकांना निवेदन सादर
सातारा, २६ जानेवारी (वार्ता.) – येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘पठाण’ चित्रपटाला प्रखर विरोध दर्शवण्यात आला आहे.
२४ जानेवारी या दिवशी सातारा शहरातील ‘राजलक्ष्मी’ चित्रपटगृहाचे मालक आणि ‘सेव्हनस्टार’ चित्रपटगृह व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, तसेच भाजप आणि भाजपप्रणित व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चित्रपटगृहमालक आणि व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पठाण चित्रपटातील नायिकेने भगव्या रंगाचे अंतर्वस्त्र (बिकिनी) परिधान करून ‘बेशरम रंग…’ या गाण्यावर अश्लील अंगविक्षेप करत नृत्य केले आहे. हिंदु धर्मात भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक मानण्यात आला आहे. हा हिंदु धर्माचा अपमान आहे. सध्या महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चे’ निघत आहेत; मात्र त्याच वेळी लव्ह जिहादला पाठबळ देणारे ‘पठाण’सारखे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘फिल्म जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना भ्रष्ट करण्याचा एककलमी कार्यक्रम एका विशिष्ट पंथियांकडून राबवला जात आहे. ‘पठाण’ चित्रपट हा त्याचाच एक भाग आहे, अशी आम्हाला निश्चिती आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कोणत्याही चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. आपणही योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे.