हिंदुजातीला अक्षय्य उज्ज्वलता देणारे शंभूराजे ! – स्वातंत्र्यवीर सावरकर
‘आपल्या रानटी शत्रूंच्या समोर हताश राजबंदी करून छत्रपती संभाजी महाराजांना आणले असताही ते (संभाजीराजे) ताठ उभे राहिले आणि जीवनाचे मोल घेऊनही आपला धर्म विकावयाचे त्यांनी स्पष्ट नाकारले. मरण टाळण्यासाठी धर्मांतर करावयाची कल्पना त्यांनी त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या पूर्वजांच्या धर्माविषयीच्या निष्ठेचा पुनर्घोष करून त्यांनी आपल्या मुसलमानी छलकांवर, त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा आणि शिव्याशापांचा वर्षाव केला. मराठी सिंहाला याप्रमाणे आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे, असे पाहून औरंगजेबाने या ‘काफरा’चा वध करण्याविषयी आज्ञा दिली; पण या धमकावणीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता ! तापवून रक्त केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्यांची डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले; त्यांच्या जिभेचे क्रमशः तुकडे तुकडे तोडण्यात आले; पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही. अंती त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मुसलमानांच्या धर्मवेडाला तो बळी पडला; पण त्याने हिंदुजातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली. या एक आत्यंतिक चळवळीचे आत्मरूप जसे विशद करून दाखविले, तसे दुसरेे कशानेही दाखवणे शक्य नव्हते !
संभाजीराजांनी आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही, तर ती अनेक पटींनी उज्ज्वल आणि बलशाली केली ! हिंदु धर्मासाठी आत्मबलीदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदु स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.’
(संदर्भ : ‘हिंदुपदपादशाही’, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर)’