‘महावितरण’च्या पुणे परिमंडळामध्ये वर्षभरात ५३ नागरिकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
पुणे – ‘महावितरण’च्या पुणे परिमंडळ परिसरामध्ये मागील वर्षामध्ये विजेचा धक्का (शॉक) लागून ५३ नागरिकांचा मृत्यू झाला. २९ जण घायाळ झाले आहेत, तर ३६ जनावरांना प्राण गमवावे लागले आहेत. तुटलेल्या तारा, पडलेले खांब हटवण्याचा प्रयत्न करणे, ‘स्वीच बोर्ड’ आणि वायर स्वत:च दुरुस्त करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडाने तारांना स्पर्श करणे आदी कारणांनी अपघात झाल्याचे समोर येत आहे; परंतु ‘महावितरण’चा एकही कर्मचारी अपघातात घायाळ झालेला नाही.
वीजयंत्रणा आणि उपकरणे हाताळतांना सुरक्षेची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा वीज ग्राहक निष्काळजीपणे वागून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यातूनच अपघात घडतात. जिल्ह्यातील ७ तालुक्यांसह पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मिळून ५० हून अधिक अशा घटना घडल्या आहेत.