राज्यभरात शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटास ठिकठिकाणी विरोध
मुंबईसह अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात चित्रपट प्रदर्शित !
मुंबई – शाहरूख खानचा वादग्रस्त, अश्लील गाणी असलेला चित्रपट ‘पठाण’ २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या अगोदरपासूनच याला होणारा तीव्र विरोध पहाता मुंबईसह अनेक ठिकाणी हा चित्रपट पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित करण्यात आला. (पोलीस प्रशासनाने चित्रपटगृहांना संरक्षण देण्यात वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ-पैसा अन्य गन्ह्यांमधील गुन्हेगारांना रोखणे, तसेच अन्य योग्य कामांसाठी वापरल्यास ते संयुक्तिक ठरेल ! – संपादक) ‘पठाण’च्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करत निदर्शने केली. इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
१. इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी अगोदरच चित्रपटगृहमालकांना भेटून चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी निवेदन दिले होते. चित्रपटगृह मालकांनी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचे सांगितले होते.
२५ जानेवारीला विश्व-हिंदु परिषद आणि बजरंग-दल यांच्या वतीने ‘फॉर्च्युन सिनेफ्लेक्स’समोर निर्दशने करून ‘पठाण’चे ‘पोस्टर्स’ फाडून टाकले.
२. कोल्हापूर शहरात २५ जानेवारीला बजरंग दल-विश्व हिंदु परिषद यांनी ‘आयनॉक्स मल्टिप्लेक्स’ चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली.
कोल्हापूर शहरात भाजपचे सचिन तोडकर यांना ‘चित्रपट प्रदर्शनास व्यत्यय आणू नये’; म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना १४९ प्रमाणे नोटीस दिली आहे.
३. सांगलीत चित्रपट प्रदर्शित करू नये; म्हणून बजरंग दलाने २४ जानेवारीला अनेक चित्रपटगृहांना भेटून निवेदन दिले.
४. शाहरूखप्रेमींकडून काही ठिकाणी एकेका खेळाची पूर्ण नोंदणी करण्यात आली होती. काही ठिकाणी वाजंत्री घेऊन लोक आले होते, तर अनेक ठिकाणी विविध प्रकारे स्वागत करण्यात आले. (शाळा-महाविद्यालये येथे राष्ट्रप्रेमाचे धडे न दिल्याने आजचे तरुण देशासमोरील समस्यांना वेळ देण्याऐवजी भारतीय संस्कृतीचे हनन करणार्या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे ! – संपादक)
५. कोल्हापूर – गडहिंग्लज शहरात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी एकत्र येऊन एका चित्रपटागृहातील ‘पठाण’चा खेळ बंद केला.
६. सातारा येथे ‘सकल हिंदु समाज कृती समिती’च्या वतीने ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात निवेदन देण्यात आले.