विशाळगडावर उभारण्यात येत असलेल्या ‘अनधिकृत शेड’वर कारवाई करा !
पुरातत्व विभागाचे शाहूवाडी तहसीलदारांना पत्र
कोल्हापूर – विशाळगड हा राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात येतो. यावर कोंबडे कापण्यासाठी मुराद महंमद मुजावर यांच्याकडून अनधिकृतपणे पत्र्याची शेड उभारली जात असल्याविषयी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनकडून तक्रार प्राप्त झालेली आहे. तरी तालुका दंडाधिकारी या नात्याने, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा भंग होऊ नये याकरता पत्राशेड उभारणारे मुराद महंमद मुजावर यांच्यावर आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पत्र पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी शाहूवाडी तहसीलदार यांना पाठवले आहे. (विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पुरातत्व विभागास दिसत नाही का ? प्रत्येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्यावरच कारवाई करणार आहे का ? त्यामुळे शिवप्रेमी आणि गडकोटप्रेमी यांनी असा निष्क्रीय आणि दायित्वशून्य विभागच विसर्जित करण्याची मागणी केल्यास नवल ते काय ? – संपादक)
१. महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवास्तूशास्त्र विषयक स्थळे अन् अवशेष नियम १९६२ मधील नियम क्र. ८ (अ) नुसार स्मारकाच्या कोणत्याही भागाची हानी होईल, असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे, तसेच ८ (अ) नुसार स्मारकाच्या कोणत्याही भागात अन्न शिजवता किंवा भोजन करता कामा नये. (आजपर्यंत विशाळगडावर सर्रास प्राणीहत्या केली जाते, तसेच अन्न शिजवले जात होते. मग आजपर्यंत या नियमान्वये कुणावरच कारवाई का करण्यात आली नाही ? – संपादक)
२. ८ (ड) नुसार पुराणवास्तूशास्त्र अधिकार्याने अधिकार दिल्याविना त्याने दिलेल्या अनुमतीविना तेथे कोणतीही वस्तू घेऊन विक्री करता येऊ शकत नाही.
३. तरी राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे पत्राशेड उभारणारे मुराद महंमद मुजावर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
संपादकीय भूमिका‘पुरातत्व विभागा’चा वरातीमागून घोडे अशा स्वरूपाचा कारभार ! |