मणीपूरमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
इंफाळ (मणीपूर)- मणीपूरच्या थौबल जिल्ह्यात २४ जानेवारी या दिवशी भाजपच्या राज्य युनिटच्या माजी सैनिक सेलचे संयोजक लैशराम रामेश्वर सिंह यांची सकाळी क्षेत्री भागातील त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
मणिपुर में भाजपा नेता की दिन दहाड़े गोली मारकर हत्या, मुख्य आरोपी ने किया सरेंडर https://t.co/RyvlyZyMDO
— Hindustan (@Live_Hindustan) January 24, 2023
थौबाल पोलीस अधीक्षक हाबीजम जोगेशचंद्र यांनी सांगितले की, २ जण नोंदणी क्रमांक नसलेल्या चारचाकी गाडीमधून आले आणि त्यांनी सिंह यांच्यावर सकाळी ११ वाजता गोळीबार केला. सिंह यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. वाहनचालक नौरेम रिकी पॉइंटिंग सिंह आणि गोळीबार करणारा अयेकपम केशोरजीत यांना अटक करण्यात आली आहे. केशेरजीत याच्याकडून एक परवाना असलेले पिस्तूल, २ मॅगझिन आणि ९ काडतुसे जप्त करण्यात आली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.