एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान अणूयुद्धासाठी सिद्ध झाले होते !
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमत्री माईक पॉम्पियो यांचा दावा
वॉशिंग्टन (अमेरिका) – बालाकोट येथील एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान अणूयुद्धाच्या सिद्धतेत होते, असा दावा अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी त्यांच्या ‘नेव्हर गिव्ह अॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात केला आहे. पॉम्पियो यांच्या या दाव्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथील आक्रमणानंतर भारताने पाकमधील आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर एअर स्ट्राईक केले होते.
सर्जिकल स्ट्राइक के बाद भारत पर परमाणु हमला करना चाहता था पाकिस्तान’, US के पूर्व विदेश मंत्री का दावा#MikePompeo #India #SurgicalStrike #Nuclearattackhttps://t.co/A7amDgCHzr
— Hindustan (@Live_Hindustan) January 25, 2023
पॉम्पियो यांनी यात पुढे दावा केला आहे की, भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याची सिद्धता केली असल्याचे सांगण्यासाठी भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मला झोपेतून उठवले होते. तसेच पाकिस्तानने आक्रमण केल्यास प्रत्युतरादाखल अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याची भारतही सिद्धता करत आहे, असेही सुषमा स्वराज यांनी सांगितले होते. यानंतर आम्हाला काही घंट्यांचा कालावधी लागला आणि आम्ही ते टाळले. यासाठी देहली आणि इस्लामाबाद येथील आमच्या पथकाने चांगले काम केले. दोन्ही देशांना समजावण्यात आले की, त्यांनी अणूयुद्धाची सिद्धता करू नये.
तत्कालीन परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांच्याशी चांगली मैत्री झाली होती !
पॉम्पियो यांनी या पुस्तकात असेही म्हटले आहे की, भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे कधीही ‘महत्त्वपूर्ण राजकीय व्यक्ती’ म्हणून पहाणे झाले नाही; मात्र तेव्हाचे परराष्ट्र सचिव एस्. जयशंकर यांच्याशी माझी पहिल्याच भेटीत मैत्री झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी जवळीक होती.
अमेरिकेने भारताची केलेली उपेक्षा हे तिचे अपयश !
पॉम्पिओ यांनी पुस्तकात हे मान्य केले की, अमेरिकेने सातत्याने भारताची उपेक्षा करणे हे तिचे अपयश होते. भारत अमेरिकेची बौद्धिक संपदा आणि उत्पादन यांची मागणी पूर्ण करणारी पेठ आहे. यासह अमेरिकेने दक्षिण आशियामध्ये चीनच्या आक्रमकतेचा सामना करण्यासाठी भारताला कुटनीतीक आधार बनवला आहे.