तुर्भे येथे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य भरून देण्याची सुविधा !
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य भरून देण्याची सुविधा तुर्भे सेक्टर २१ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात चालू करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महानगरपालिकेच्या वतीने यंदा विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे सक्तीचे केले आहे. शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, तसेच विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बँकेत खाते असणे आवश्यक आहे. ३१ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे, अशा अटी मनपाने घातल्या आहेत.
राष्ट्रीय बँकेत खाते उघडणे आणि उत्पन्नाचा दाखला काढणे हे करतांना रहिवाशांना बराच भुर्दंड सोसावा लागतो. ४ – ५ घंटे रांगेत उभे रहावे लागते. अर्ज ऑनलाईन भरण्याच्या सक्तीमुळे रहिवाशांना आणखी भुर्दंड पडणार होता. याविषयी माथाडी कामगार आणि अन्य रहिवाशांनी माथाडी नेते तथा माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांंना सांगितल्यावर तुर्भे येथील त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य भरून देण्याची सुविधा चालू करण्यात आली. या सुविधेचा लाभ सर्व तुर्भेकरांनी घ्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील आणि समाजसेविका कविताताई पाटील यांनी केले आहे.