दहिवडी (जिल्हा सातारा) येथे बनावट शिधापत्रिका बनवणारे अटकेत !
बनावट शिधापत्रिका बनवणार्यांना कठोर शिक्षा करावला हवी !
सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – तहसीलदरांची बनावट स्वाक्षरी करून आणि शिक्का चोरून त्याचा वापर करणार्या, तसेच बनावट शिधापत्रिका बनवून नागरिकांना विकणार्या सूर्यकांत अवटे यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे. (तहसील कार्यालयातून शिक्का चोरला कसा जातो ? याचाही शोध घ्यायला हवा ! – संपादक)
बनावट शिधापत्रिकेविषयी दहिवडी पोलिसांकडे काही तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी ही गोष्ट माण तहसीलदारांना सांगितली. त्यांनी पुरवठा निरीक्षकांना चौकशी करून पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या अनुषंगाने अन्वेषण चालू केल्यावर सूर्यकांत अवटे हे नागरिकांकडून शिधापत्रिका बनवण्यासाठी ३ सहस्र ३०० रुपये घेत असल्याचे उघड झाले. अवटे यांना कह्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. अवटे यांनी कुणाकुणाला शिधापत्रिका बनवून दिल्या आहेत, त्यांनी दहिवडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.