कु. प्रणिता भोर यांना देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात असतांना सनातन-निर्मित धूम्रवर्णी श्री गणेशमूर्तीकडे पाहून नामजप करतांना आलेल्या अनुभूती
१. देवद आश्रमातील ध्यानमंदिरातील सनातन-निर्मित धूम्रवर्णी (निर्गुण) श्री गणेशमूर्तीकडे पाहून मानसपूजा करणे
‘मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. २६.८.२०२० या दिवशी मी ध्यानमंदिरात ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ हा नामजप करत बसले होते. नामजप करतांना मी समोर असलेल्या सनातन-निर्मित धूम्रवर्णी (निर्गुण) श्री गणेशमूर्तीकडे बघत त्याची मानसपूजा केली. मानसपूजा करतांना मी श्री गणेशाच्या चरणांवर हळद-कुंकू वाहिले. नंतर श्री गणेशाच्या गळ्यात झेंडूची फुले आणि दुर्वा यांचा हार घातला अन् चरणांवर लाल जास्वंदाचे फूल वाहिले. आरतीचे ताट फुलांनी सजवून श्री गणेशाची पंचारती आणि कर्पूरारती केली. त्यानंतर मी ‘श्री गणेशाच्या चरणांवर प्रत्येक नामजपाच्या समवेत जास्वंदाचे फूल वहात आहे’, असा भाव ठेवून पुन्हा नामजप केला.
२. मानसपूजेनंतर ‘श्री गणेशाच्या मूर्तीची हालचाल होत असून ‘श्री गणेशाच्या मूर्तीच्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री गणेशच बसला आहे’, असे जाणवणे
मानसपूजेनंतर श्री गणेशाकडे पहात असतांना ‘श्री गणेशाची मूर्ती किती सुबक आणि सजीव वाटत आहे’, असे मला वाटले. त्यानंतर मला ‘श्रीगणेशाचे चारही हात आणि मुख हलत आहे’, असे जाणवले. नंतर माझे लक्ष श्री गणेशाच्या चरणांकडे गेलेे. तेव्हा त्याच्या चरणांचीही हालचाल होत असून मला मूर्तीच्या डोळ्यांमध्ये जिवंतपणा जाणवला. त्यानंतर मी श्री गणेशाच्या मूर्तीकडे पाहिले. तेव्हा ‘त्या ठिकाणी मूर्ती नसून प्रत्यक्ष श्री गणेशच बसला असून तो हालचाल करत आहे’, असे मला जाणवले.
श्री गणेश आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आलेल्या या अनुभूतीबद्दल मी त्या दोघांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |