गणेशाच्या निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य
‘ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्र यांनुसार सूर्य प्राणशक्तीचा, तर चंद्र मनःशक्तीचा कारक आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे तिथी होतात. त्यांच्या भ्रमणामुळे निरनिराळे कोन होतात. अमावास्येला चंद्र सूर्यकक्षेत विलीन होतो. पौर्णिमेला दोघेही एकमेकांसमोर १८० अंशात क्षितिजावर दिसतात. अष्टमीला ते अर्ध समरेषेवर असतात. सूर्य आणि चंद्र यांच्या परिणामानुसार शास्त्रकारांनी प्रत्येक तिथीच्या देवता ठरवल्या आहेत. त्यात ‘चतुर्थी’ या तिथीची देवता ‘श्री गणेश’ आहे; कारण तो विघ्न दूर करतो. आपल्या संस्कृतीत श्री गणेश आणि सरस्वती या देवतांचे ‘बुद्धीदायी देवता’ असे वर्णन आहे; परंतु त्यांची कार्ये भिन्न आहेत. गणेशाच्या कृपाप्रसादाने बुद्धी आणि ज्ञान वाढते, तर सरस्वतीच्या उपासनेने मिळालेले ज्ञान शब्दरूपात व्यक्त करता येते; म्हणून तिला ‘वाक्विलासिनी’, असे म्हटले आहे. गणेशाच्या विविध अवतारांतील त्याचे नाव आणि कार्य येथे देत आहोत.
आतापर्यंत गणेशाची उत्पत्ती आणि लय हे अनेक वेळा झाले आहेत. प्रत्येक वेळी गणेशाने त्या त्या प्रसंगानुरूप अवतार धारण केले आहेत. या अवतार चरित्रांत भिन्नता वाटते किंवा दिसते; पण ते सत्य आहेत; कारण ते सारे व्यासांनी वर्णन केलेले आहे. श्रद्धा ठेवून जर गणेशाची उपासना केली, तर आजही फळ मिळते. श्रद्धेमुळेच मानवाचे कल्याण होईल.’
(संदर्भ : मासिक ‘विवेक’, १८.९.२००५)