केळे खाण्याविषयी काही प्रश्नांची उत्तरे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १४१

शंकानिरसन 

श्री. दिवाकर आगावणे : हिवाळ्‍यात केळी खाऊ शकतो का ? सर्दी झाली असल्‍यास केळी खाल्ली, तर चालेल का ?

उत्तर

वैद्य मेघराज पराडकर

१. हिवाळा हा केळे खाण्‍यासाठी उत्तम काळ 

‘अन्‍नाचे नीट पचन होऊन ते शरिरात शोषले जाण्‍यासाठी शरिरातील अग्‍नी (पचनशक्‍ती) चांगला असणे आवश्‍यक असते. केळ्‍याच्‍या झाडाला भरपूर पाणी लागते. या झाडामध्‍ये भरपूर पाणी असते. पाणी हे अग्‍नीच्‍या विरुद्ध गुणधर्माचे आहे. त्‍यामुळे केळे हे पचायला जड असते. ‘हिवाळ्‍यातील थंडीमुळे त्‍वचेवरील छिद्रे बंद होतात आणि त्‍यामुळे शरिरातील अग्‍नी कोंडला जाऊन भरपूर भूक लागते. त्‍यामुळे हिवाळ्‍यात कडकडून भूक लागते, तेव्‍हा पचायला जड पदार्थ खावेत’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्‍यामुळे हिवाळ्‍यात केळे खाऊ शकतो.

२. केळे कुणी खाऊ नये ? 

ज्‍यांना वारंवार सर्दी होते किंवा ज्‍यांना दमा, शरिरावर सूज येणे, भूक न लागणे हे त्रास होतात, त्‍यांच्‍या शरिरामध्‍ये अग्‍नी मंद झालेला असतो. अशा वेळी केळे खाऊ नये.

३. केळ्‍याचे दुष्‍परिणाम होऊ नयेत, यासाठी करायच्‍या उपाययोजना

अ. शरिराने धडधाकट असून भूकही चांगली लागते; परंतु केळे खाल्‍ल्‍यावर घशाकडे कफ येतो, अशा व्‍यक्‍तींनी केळ्‍यासह १ – २ मिरी किंवा लवंगा चावून खाव्‍यात. असे केल्‍याने केळे खाल्‍ल्‍यावर कफाचा त्रास होत नाही.

आ. चांगली पिकलेली केळी सोलून उभी चिरून चॉकलेटी रंगाची होईपर्यंत उन्‍हात वाळवावीत. या वाळवलेल्‍या केळ्‍यांना सुकेळी म्‍हणतात. ही हवाबंद डब्‍यात वर्षभर टिकतात. ताज्‍या केळ्‍यांपेक्षा यांमध्‍ये पाणी न्‍यून असते, तसेच सूर्याच्‍या उष्‍णतेचा यांवर संस्‍कार झालेला असतो. त्‍यामुळे केळी खाऊन होणारे दुष्‍परिणाम सुकेळी खाल्‍ल्‍यावर दिसत नाहीत.

इ. कितीही आवडीची असली, तरी केळी एका वेळी एक ते दोनच खावीत. अधिक केळी खाऊन न पचल्‍यास पोट बिघडते.

ई. केळे दुपारी जेवल्‍यावर किंवा सायंकाळी भूक लागेल तेव्‍हा खावे. रात्री केळे खाणे टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३)

आयुर्वेदाविषयी शंका विचारण्‍यासाठी संपर्क : ayurved.sevak@gmail.com