ऐतिहासिक पाऊल !
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ जानेवारी या दिवशी अंदमान-निकोबार बेटांवरील नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाचे उद़्घाटन केलेच; पण तेथील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’प्राप्त विजेत्या सैनिकांची नावे देऊन गौरवलेही ! पंतप्रधानांचा हा निर्णय संपूर्ण भारतासाठी सन्माननीय ठरला आहे. वर्ष १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये झालेल्या पाकविरुद्धच्या युद्धांत, तर वर्ष १९६२ मध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात शौर्य गाजवणारे भारतीय सैनिक अन् अधिकारी, तसेच वर्ष १९८७ मध्ये श्रीलंकेत ‘शांतीसेना’ म्हणून गेलेले सैनिक यांच्या नावांचा यात समावेश आहे. खरे पहाता रणभूमीवर शौर्य गाजवणार्यांचे स्मरण कोण ठेवतो ? २-४ दिवस त्यांचा गुणगौरव केला जातो आणि नंतर त्यांची नावे कुठल्या कुठे विरूनही जातात; परंतु मोदी शासनाने त्यांचे स्मरण ठेवून त्यांचा आदर राखला, ही घटना वैशिष्ट्यपूर्ण आहे. काळानुसार देशामध्ये परिवर्तन घडवून नवा इतिहास निर्माण करायला हवा. हे काम मोदी शासन करत आहे. यामुळेच प्रगतीशीलतेकडे वाटचाल करणारा भारत ‘भाग्यविधाता’ ठरणार आहे. हा निर्णय सर्वच नागरिकांसाठी विशेषतः सैन्यदलांसाठी प्रेरणादायी ठरेल. देशवासियांनी ‘धन्यवाद’, ‘जय भारत’, ‘कृतज्ञता’ यांसह अनेक अभिनंदनपर संदेश देत या निर्णयाविषयीच्या आपापल्या भावना सामाजिक माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.
भारतात आज रस्ते, मार्ग, तसेच अन्य ठिकाणी स्वातंत्र्यसैनिक, शूर योद्धे, क्रांतीकारक, राष्ट्रभक्त यांची नावे अल्प आणि मोगल आक्रमकांसह राष्ट्रद्वेष्ट्यांचीच नावे अधिक प्रमाणात दिलेली असतात. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही ही स्थिती अशीच रहाणे म्हणजे अजूनही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेत राहिल्याप्रमाणेच आहे. राजधानी देहलीमध्ये अकबर, बाबर, औरंगजेब, मोगल रोड ही नावे पालटून त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप अशा महान योद्ध्यांंची नावे द्यावीत, ही सर्वच भारतियांच्या मनातील इच्छा पंतप्रधानांनी लवकरात लवकर पूर्ण करावी. तसे झाल्यास भारतियांची छाती गर्वाने फुलून येईल. गुलामीची सर्व चिन्हे हटवण्यासाठी भगीरथ प्रयत्न करायला हवेत; पण त्यासाठी समर्पण, दृढनिश्चय आणि शौर्य असणेही आवश्यक आहे.
त्यागमय जीवन जगणारे सैनिक !
सध्या युवा वर्गाचे दिसणारे चित्र सर्वत्र समानच असते. शिक्षण पूर्ण झाले की, गलेलठ्ठ वेतनाची नोकरी करणे, विवाह करून संसार करणे, सर्व सुखे पायांशी लोळण घेतील, यांसाठी प्रयत्नरत रहाणे, अशा स्थितीतच आजचा युवा वर्ग स्वत:चे आयुष्य घालवत असतो. एकीकडे ही स्वार्थी मानसिकता असणारे तरुण, तर दुसरीकडे देशासाठी प्राणांची पर्वा न करता सैन्यदलात भरती होणारे तरुण ! त्यांना काही स्वतःचे आयुष्य नसते का हो ? पण ते स्वतःपुरता विचार न करता देशप्रेमाच्या जाणिवेतून हा खडतर आणि प्रतिकूल असा मार्ग निवडतात. ‘त्यांच्या त्यागाला सीमाच नसते; कारण तेथे किती प्रमाणात प्रतिकूल स्थिती असते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण पंख्याखाली किंवा आसंदीवर बसून किंवा वातानुकूलित यंत्र असलेल्या खोलीत बसून बर्फामध्ये रहाणार्या सैनिकांचे व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून पहात असतो अन् त्यांना केवळ ‘लाईक’ देतो. सर्वांचे इतकेच देशप्रेम असते. बर्फामध्ये आयुष्यातील प्रत्येक क्षण व्यतीत करणे काय असते, हे तेथील परिस्थितीला तोंड दिलेलाच सांगू शकेल. एका ‘लाईक’नंतर सैनिकांविषयीच्या जाणिवेकडे सर्वांचे पूर्णतः दुर्लक्ष होते. देशप्रेम उफाळून कधी येते, तर केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोनच दिवशी ! त्यानंतर ‘देशप्रेम’ हा शब्दही क्वचितच उच्चारला जातो. या पार्श्वभूमीवर बेटांच्या नामकरणाचा निर्णय कृतीशील ठरू शकतो. ‘परमवीर चक्र’ म्हणजे काय ? ते प्राप्त होण्यासाठी कोणते शौर्य गाजवावे लागते ? किती सैनिकांना आतापर्यंत ते मिळाले आहे, अशा दृष्टीने सर्वांची विचारप्रक्रिया तरी चालू होऊ शकते. अंदमान-निकोबार येथे भेट देणार्यांच्या मनात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी तर अभिमान निर्माण होईलच; पण तेथील बेटांचे केलेले नामकरण पाहून सैनिकांविषयी आदराची भावना नागरिकांमध्ये जागृत होईल. बेटांचे केलेले नामकरण आणि २१ शूरवीर यांच्याविषयीची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांतही त्यांचा समावेश करणे उचित ठरेल. अनेक जण नोकरी करतात आणि पैसे कमावतात. सैनिकांनाही वेतन मिळते; परंतु प्रत्येकाच्या कर्तव्यातील जाणिवा विभिन्न आहेत. त्यांची कामगिरी, कर्तव्यतत्परता, निष्काम केलेली देशसेवा, त्यागभावना या सर्व गोष्टी देशासमोर यायला हव्यात. यासाठीसुद्धा हे नामकरण सयुक्तिक ठरेल. या नामकरणामुळे भारतात क्रांती घडेल. ज्या योद्ध्यांची नावे बेटांना देण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी ही खरी श्रद्धांजली ठरेल !
तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात जे साध्यच झाले नसते, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करून दाखवले. बलीदान दिलेल्यांविषयीच्या स्मृती या बेटांच्या माध्यमातून चिरंतन काळ टिकतील. देशासाठी धारातीर्थी पडलेला प्रत्येक सैनिक इतिहासात अजरामर होईल. आपल्या कामगिरीची देशपातळीवर नोंद घेतली जाते, हे सैनिकांसाठीही अभिमानास्पद आहे. या क्रांतीकारी पावलामुळे नव्याने सैन्यात भरती होणार्यांचाही आत्मविश्वास दृढ होईल. मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केलेल्यांचा शासन सन्मान करते, हे समजल्याने प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित करण्याची त्यांची ओढ वाढेल. भारताच्या लष्करी सामर्थ्याची ओळखही या माध्यमातून संपूर्ण जगाला होईल.
भारतियांनो, कृतीशील व्हा !
येत्या २६ जानेवारीला असणार्या प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर २३ जानेवारी या दिवशी पंतप्रधानांनी नवा ऐतिहासिक प्रारंभ केला आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या रक्षणासाठी भारतियांनीही आता कृतीशील व्हायला हवे.