तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन !
रायपूर (छत्तीसगड) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा होती, ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’ आज आम्ही घोषणा करतो, ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली. ‘आता ही घोषणा तुम्ही समाजामध्ये पसरवा’, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत हिंदु राष्ट्र झाले की, हिंदुविरोधी समस्या सुटतील !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पुढे म्हटले की, भारताला पूर्णपणे हिंदु राष्ट्र बनवा, हे मी याचसाठी सांगतो कारण सनातनला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सातत्याने श्रीरामचरितमानसच्या विरोधात गरळ ओकली जात आहे, श्रीराम यात्रेवर दगड फेकले जात आहेत, श्रीरामावर, संतांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे भारत जर हिंदु राष्ट्र झाला, तर या सर्व समस्या सुटतील !
सौजन्य : News18 India
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी केलेली विधाने
१. केवळ बागेश्वर धामवर आक्षेप घेण्याची गोष्ट नाही, तर प्रत्येक सनातन्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. आता बांगड्या घालून घरात बसू नका. आता बाहेर पडायला हवे. जर तुम्ही बाहेर पडला नाहीत, तर आम्ही तुम्हाला भ्याड म्हणू.
२. भारतातील प्रत्येक संत आमच्या समवेत आहे, हे आमचे भाग्य आहे. आम्ही सर्व साधूंना प्रार्थना करतो की, त्यांनी गप्प बसू नये. बागेश्वर धाम केवळ निमित्त आहे. खरेतर धर्मविरोधकांचे लक्ष्य सनातन आहे.
३. हा एक चमत्कारच आहे की, भारतातील हिंदू संघटित होत आहेत.
४. भारतातील पत्रकारिता सत्य दाखवते आणि प्रसारमाध्यमांनी दरबारमध्ये जे सत्य आहे, तेच दाखवले.
मी कधीही राजकीय पक्षात जाणार नाही आणि राजकारण करणार नाही !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वेळी स्पष्ट केले की, मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही आणि कधीही राजकारण करणार नाही. मी केवळ सनातन्यांना संघटित करण्याच्याच गोष्टी करीन.
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ठार मारण्याची धमकी
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना ठार मारण्याची धमकी त्यांचे एक नातेवाईक लोकेश गर्ग यांना देण्यात आली आहे. भ्रमणभाषवरून ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणार्याचे नाव अमर सिंह असल्याचे गर्ग यांनी सांगितले. गर्ग यांनी छतरपूर पोलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.