‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’च्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील ‘तिकोनागडा’च्या संवर्धनाकरिता विकास आराखडा सिद्ध !
वडगाव मावळ (पुणे) – तिकोनागडाच्या संवर्धनाकरिता गडाचा शास्त्रशुद्ध संवर्धन विकास आराखडा सिद्ध करून घेतला आहे. त्यामुळे गडावर सुधारणांची विविध कामे करण्यासाठी राजाश्रय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती वडगाव मावळ येथील ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थे’ने दिली आहे. अशा प्रकारचा आराखडा सिद्ध करणारी ही पहिलीच संस्था असेल.
पुरातत्व खात्याचे वास्तूविशारद आफळे असोसिएट यांनी प्रत्यक्ष गडावर येऊन पहाणी केली.
‘ड्रोन’ने पहाणी करून अत्याधुनिक साधनासह तिकोनागडाचा आराखडा सिद्ध केला. त्याकरिता १ लाख रुपयांचा व्यय करण्यात आला. या आराखड्यानुसार गडावरील दरवाजे, कमानी, तटबंदीची दुरुस्ती, मजबुतीकरण, वितंडेश्वर मंदिर आणि परिसर सुधारणा, माहिती केंद्र व गडाच्या पायथ्याला प्रसाधनगृह आदी बाबींचा समावेश आहे. नुकताच ‘विजयदिना’चे औचित्य साधत या आराखड्याचे अनावरण करण्यात आले, तसेच आराखडा पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पुरातत्व खात्याकडे सादर करण्यात आला आहे.
छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडदुर्गांचे संवर्धन करण्यासाठी ‘गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था’ शिवभक्तांच्या साहाय्याने तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. हे कार्य करतांना प्रामुख्याने शासकीय अनुमती, आर्थिक निधी, मनुष्यबळ, शास्त्रीय पद्धतीने करावयाचे संवर्धन अशा समस्या निर्माण होतात. गडदुर्ग हे शासनाच्या कह्यात असलेल्या त्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करायचे झाल्यास शासकीय बाबी पूर्ण कराव्या लागतात.
गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे श्री. किरण चिमटे म्हणाले, ‘‘विकास आराखडा सिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पडले आहे. त्यासाठी ज्यांनी-ज्यांनी साहाय्य केले त्या सर्व शिवभक्तांचे मन:पूर्वक आभार मानतो. या आराखड्यामुळे गडाच्या विकासाला खर्या अर्थाने चालना मिळेल.’’