सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन !
सोलापूर, २३ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवून हिंदूंचे संघटन व्हावे, या संघटनाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखले जावेत, यासाठी सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानात १५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून या निमित्ताने २२ जानेवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवबा शहापुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर श्री. मिस्कीन यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. विक्रम घोडके यांनी शहरातील सहस्रो धर्मप्रेमींनी सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहन कलशेट्टी यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, तसेच धर्मप्रेमी सर्वश्री यश मुगड्याल, विजय यामजले, दीपक चिन्नी, श्रीकांत बिंगी, प्रथमेश म्हाडा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला धर्मप्रेमीही उपस्थित होत्या.
क्षणचित्र – कार्यक्रमाला उपस्थित धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित रहाण्याचा निर्धार केला.