मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणारे श्री. गणेश पवार आणि अहं अल्प असणार्या अन् तळमळीने सेवा करणार्या सौ. सुहासिनी पवार !
मूळचे बोरीवली, मुंबई येथील आणि आता बांदिवडे, गोवा, येथे रहाणारे श्री. गणेश पवार अन् सौ. सुहासिनी पवार यांच्याविषयी त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. अधिवक्त्या (सौ.) अदिती अमित हडकोणकर (धाकटी मुलगी), पाळे, शिरदोन, गोवा.
१ अ. श्री. गणेश लक्ष्मण पवार (वय ६१ वर्षे) (वडील) यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१ अ १. कष्टमय जीवन : ‘बाबांचे बालपण पुष्कळ कष्टात गेले. त्यांच्या वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे त्यांना लहान वयातच शिक्षण सोडून काम करावे लागले. त्यांनी मुंबईला येऊन परिस्थितीशी जुळवून घेऊन कष्ट केले. वेळ प्रसंगी त्यांना नातेवाइकांकडे रहावे लागले. नंतर देवाच्या कृपेने त्यांना साधना कळली आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात स्थिरता आली; म्हणून बाबा नेहमी म्हणतात, ‘‘हे सर्व केवळ गुरुदेवांमुळेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच) शक्य झाले आहे.’’
१ अ २. मुलांना साधना करण्यासाठी साहाय्य करणे : आमची आर्थिक स्थिती साधारणच होती, तरीही त्यांनी माझा भाऊ शुभम् आणि मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ‘मुलाने नोकरी करावी’, असा बाबांचा अट्टाहास नव्हता. त्यांना नेहमी वाटते, ‘ही माझी मुले नसून गुरुमाऊलीचीच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच) मुले आहेत. मुले आश्रमात आहेत, तर देव त्यांचे कधीच वाईट करणार नाही.’ बरेच नातेवाईक त्यांना म्हणतात, ‘‘तुम्ही मुलीला आश्रमात पाठवले आहे, तर मुलाला आश्रमात कशाला पाठवता ? त्याला नोकरी करायला सांगा.’’ बाबा नातेवाइकांना योग्य उत्तर देऊन शांत करतात.
१ अ ३. व्यवस्थितपणा : बाबांमध्ये पुष्कळ व्यवस्थितपणा आहे. त्यांचे अक्षरही सुंदर आहे. बाबांच्या सेवेशी संदर्भातील अहवालांच्या वह्या नेहमी पूर्ण आणि सुंदर असतात.
१ अ ४. सेवाभाव
अ. बाबा मुंबई येथे असतांना धर्मशिक्षण फलक लिहिण्याची आणि दिवाळीसाठी आकाशकंदील बनवण्याची सेवा करायचे. ते कुठलीही सेवा आनंदाने करतात.
आ. बाबा १५ वर्षांपेक्षाही अधिक काळ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करत आहेत. त्यासाठी ते सकाळी ५.३० वाजता उठून दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक आणायला जात असत आणि त्यानंतर ते कामाला जात असत. गोवा येथे स्थायिक झाल्यापासूनही ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतात.
१ आ. सौ. सुहासिनी गणेश पवार (आई) (वय ५६ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ आ १. परिस्थिती स्वीकारून कष्ट करणे : आईच्या माहेरची आर्थिक स्थिती चांगली होती; मात्र आमच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आईने सर्वकाही ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारले आणि अर्थार्जनासाठी ती घराबाहेर पडली. त्यासाठी तिने बिंदूदाबन आणि शरीर मर्दन (बॉडी मसाज) यांचे प्रशिक्षण घेतले. आई सतत कार्यरत असते. तिला वेळ आहे आणि तिने तो वाया घालवला, असे कधीच होत नाही.
१ आ २. आईला पहिल्यापासून कशाचीच आसक्ती नाही.
१ आ ३. सेवेची तळमळ
१ आ ३ अ. रुग्णांना मर्दन करतांना साधना सांगणे : आई रुग्णाला मर्दन (‘मसाज’) करतांना ‘यांना साधना कशी सांगू शकते ?’, याचाच विचार करायची. ती रुग्णांना साधना सांगून त्यांच्याकडून अर्पण घ्यायची आणि त्यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वर्गणीदार करायची. ती ग्रंथ आणि सनातन पंचांग यांसाठी प्रायोजकही मिळवायची. बरेच रुग्ण बरे झाल्यानंतर आईला म्हणायचे, ‘‘तुम्ही केवळ आमच्याशी बोलायला येत जा.’’
१ आ ३ आ. ‘मुलीला आश्रमात रहायला पाठवले आहे’, याविषयी रुग्णांना कौतुक वाटणे : आई साधना शिकली आणि तिने आम्हालाही साधना शिकवली. त्यामुळे आज आम्हाला त्याचा पुष्कळ लाभ होत आहे. ‘आईने मला आश्रमात रहायला पाठवले आहे’, याविषयी काही रुग्णांना आईचे पुष्कळ कौतुक वाटते. ते आईला म्हणायचे, ‘‘वो तो गुरुकन्या है । आपने अच्छा किया है ।’’
१ आ ३ इ. एकटीने ग्रंथप्रदर्शनासाठी साहित्य घेऊन जाऊन ग्रंथप्रदर्शनाची सेवा करणे : ग्रंथप्रदर्शनासाठी ‘स्टँड’, उत्पादने, ग्रंथ इत्यादी साहित्य घेऊन जावे लागते आणि ते पुष्कळ जड असते. बर्याचदा ग्रंथप्रदर्शनासाठी सहसाधक नसायचे. तेव्हा आई एकटीच सर्व साहित्य घेऊन जायची आणि ग्रंथप्रदर्शन लावायची.
१ आ ३ ई. प्रतिमा न जपता धर्मशिक्षणाचे फलक ठिकठिकाणी लावणेे आणि परत आणणे : मी धर्मशिक्षण फलकाचे लिखाण करत होते. तेव्हा ‘तो फलक हातातून घेऊन जाऊन ठिकठिकाणी लावणे’, या सेवा करतांना माझ्या मनात प्रतिमेचे विचार येत असत, उदा. ‘कोणी मला काही विचारले, तर काय होईल ?’; मात्र आईच्या मनात असे विचार कधीच आले नाहीत. ती आम्हाला म्हणायची, ‘‘तुम्ही केवळ फलक लिहून द्या. ‘फलक ठेवणे आणि आणणे’ या सेवा मी करते.’’ तिला कधीच कुठल्याही सेवा लहान किंवा मोठ्या वाटल्या नाहीत.
१ आ ४. श्रद्धा : आईला एखाद्या मोहिमेसाठी पोलिसांची अनुमती घ्यायची कधीच भीती वाटत नसे. ‘गुरूंचे कार्य गुरुच करवून घेणार आहेत’, असा भाव ठेवून आई ती सेवा करायची.
१ आ ५. पालट
१ आ ५ अ. आनंदी आणि स्थिर दिसणे : आता आई घरी असतांना तिचा व्यष्टी साधना करण्याकडे अधिक कल असतो. ती आता पूर्वीपेक्षा आनंदी आणि स्थिर दिसते. परिस्थिती कशीही असली, तरी ती आनंदाने स्वीकारून आई साधना शिकली आणि तिने आम्हालाही साधना शिकवली. त्यामुळे आज आम्हाला त्याचा पुष्कळ लाभ होत आहे.
१ इ. आई-वडील दोघांविषयी जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये !
१ इ १. आई-वडील दोघेही नियमित पहाटे ५.३० वाजता उठून नामजप करतात.
१ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : आई-वडिलांचा श्री गुरूंप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ भाव आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांना अनुमाने ७ – ८ मास रत्नागिरी येथे माझ्या मामांच्या घरी रहावे लागले. तेव्हा त्यांनी मे २०२० मध्ये गुरुमाऊलीचा जन्मोत्सव आणि त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मामांच्या घरी भावपूर्ण सिद्धता केली होती. त्यांनी केलेल्या सिद्धतेचे छायाचित्र पाहून आमचीही भावजागृती झाली. तेव्हा मामांनाही चांगले वाटले.’
२. श्री. शुभम् पवार (मुलगा), बांदिवडे, गोवा
२ अ. श्री. गणेश लक्ष्मण पवार (वय ६१ वर्षे) (वडील) यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
२ अ १. नियमितपणा : बाबा अंघोळ झाल्यावर नियमितपणे मारुति स्तोत्र वैखरीतून म्हणतात. ते ऐकून माझेही ते स्तोत्र तोंडपाठ झाले आहे.
२ अ २. बाबा एकदा सेवेसाठी बसल्यावर ती सेवा एकाग्रतेने, भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.
२ आ. सौ. सुहासिनी गणेश पवार (आई) (वय ५६ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ आ १. मुलामध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करणे
अ. बाहेरगावी सेवेला असतांना एक दिवस मी सहज आईला भ्रमणभाष केला आणि लगेच दुसर्या दिवशीही केला. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘साधना गांभीर्याने करावी. असा सारखा आईला भ्रमणभाष करायचा नाही.’’
आ. ‘आपले वागणे-बोलणे कसे असावे ?’, हे ती मला तत्त्वनिष्ठतेने सांगते. त्यासाठी तिने मला स्वयंसूचनाही घ्यायला सांगितल्या. तिने लहानपणापासून मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेतील सूत्रांनुसारच घडवले आहे.
२ इ. आई-वडील या दोघांविषयी जाणवलेली सामायिक सूत्रे
२ इ १. मुलाची सेवा आणि साधना महत्त्वाची वाटणे : ‘आई-बाबा मला माझ्या सेवेच्या वेळेत भ्रमणभाष करत नाहीत. ते मला सांगतात, ‘तुला वेळ मिळाल्यावर भ्रमणभाष कर. सेवा महत्त्वाची आहे.’
२ इ २. न्यूनपणा घेणे : एखाद्या प्रसंगात दोघांमध्ये दुमत झाले, तर दोघांपैकी एक जण न्यूनपणा घेतो.
२ इ ३. आई-बाबा प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहातात.
२ इ ४. समाजातील लोकांमध्ये आई-बाबांविषयी असलेला आदर : आई-बाबा सनातन संस्थेचे साधक असले, तरी समाजात ‘सामाजिक कार्य करणारे दांपत्य’, असा त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे समाजात एखादे नवीन कार्य चालू करण्यापूर्वी समाजबांधव आई-बाबांचे मार्गदर्शन घेतात आणि त्यांच्या विचाराला प्राधान्य देतात.
२ इ ५. आई-बाबांचा माजी राज्यपालांच्या हस्ते सत्कार झाल्यावर त्यांनी त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे : आई-बाबा निरपेक्षपणे धर्मकार्य करतात. उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री. राम नाईक यांच्या हातून त्यांचा बोरीवली (मुंबई) येथे सन्मान झाला होता. आई-बाबांनी त्याचे सर्व श्रेय सनातन संस्थेला दिले. ‘गुरुदेवच सर्व करवून घेतात’, असा त्यांचा भाव आहे.
परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला असे आई-वडील लाभले. ‘आम्हा भावंडांच्या चेहर्यावरील आनंद’ हाच त्यांच्या जीवनातील परमोच्च आनंद आहे. त्यासाठी ते आम्हा भावंडांना आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी आणि साधनेत पुढे नेण्यासाठी निरपेक्षपणे साहाय्य करत आहेत. परात्पर गुरुदेव अन् आई-बाबा यांच्या कोमल चरणी शरणागतभावाने कृतज्ञतापूर्वक शिरसाष्टांग नमस्कार !’
३. सौ. निधी शिंदे (मोठी मुलगी), अंधेरी, मुंबई.
३ अ. श्री. गणेश लक्ष्मण पवार (वय ६१ वर्षे) (वडील) यांच्यामध्ये जाणवलेला पालट !
‘पूर्वी बाबांचा स्वभाव फार तापट होता; पण साधनेत आल्यापासून ते शांत झाले आहेत.
३ आ. सौ. सुहासिनी गणेश पवार (आई) (वय ५६ वर्षे) हिचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य !
आईने आम्हा तिन्ही भावंडांवर समान प्रेम आणि संस्कार केले.
३ इ. आई-वडील दोघांविषयी जाणवलेले समान सूत्र !
३ इ १. प्रेमाने सर्वांना जोडणे : आई-बाबा दोघांमध्येही पुष्कळ प्रेमभाव आहे. ते बोरीवली सोडून गोव्याला रहायला जातांना निरोप देण्यासाठी लोकांची पुष्कळ गर्दी झाली होती. तेव्हा तिथे जमलेल्या लोकांच्या डोळ्यांतील अश्रू बघून ‘आई-बाबांविषयी सगळ्यांच्याच मनात पुष्कळ आदराचे स्थान निर्माण झाले आहे’, हे माझ्या लक्षात आलेे.’
४. सौ. गौरी चौधरी, फोंडा, गोवा.
१. ‘सौ. सुहासिनी पवारकाकू व्यष्टी साधनेचे ध्येय ठेवून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
२. काकूंनी माझा मुलगा श्रीहरि याला ‘त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, आरती म्हणणे, भजन म्हणणे इत्यादी गोष्टी शिकवल्या आहेत.
३. पवार काका-काकू यांचा आम्हाला आधार वाटतो आणि ते आमचे शेजारी नसून कुटुंबीय झाले आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २२.१.२०२२)