जातीवाद सोडून हिंदूंनी स्वतःची मतपेढी सिद्ध केल्यासच हिंदूंचे अस्तित्व टिकेल ! – कालीचरण महाराज
सोलापूर – हिंदूंनी जातीवाद, वर्णवाद, भाषावाद सोडून हिंदु मतपेढी (व्होट बँक) बनवली, तरच हिंदूंचे अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलतांना केले. या वेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात कायदा करण्याचीही मागणी केली.
ते म्हणाले, ‘‘मी सर्वांना आवाहन करतो की, राजकारणाचे हिंदुकरण करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कायद्याची संमती हवी असेल, तर हिंदूंनी मतपेढी सिद्ध करणे आवश्यक आहे. राजा कट्टर हिंदुत्वनिष्ठ असेल, तरच हिंदूंचे (हिंदुत्वाचे) रक्षण होईल. रामराज्य हवे असल्यास राजा श्रीराम हवा. हिंदूंनी सावध होऊन राजकारणाचे हिंदुकरण करणे आवश्यक आहे. स्वतः १०० टक्के मतदान करणारी मतपेढी सिद्ध केली, तरच सर्व मागण्या पूर्ण होतील. महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी मोर्चे निघत आहेत. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना मोर्चे काढत आहेत.’’