अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा गाभारा ७०० कोटींचा !
पहिल्या टप्प्यातील बांधकाम १ सहस्र ५०० कोटींच्या घरात ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज
संभाजीनगर – संपूर्ण देशाचे लक्ष असलेले अयोध्या येथील श्रीराम मंदिर जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. आतापर्यंत मंदिराच्या गर्भगृह निर्मितीवर ७०० कोटी रुपयांहून अधिक व्यय झाला आहे; पण गर्भगृह आणि सुरक्षा भिंत या पहिल्या टप्प्यावर १ सहस्र ५०० कोटी रुपयांपर्यंत व्यय येणार आहे, असा अंदाज अयोध्या मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आणि गीता परिवारचे संस्थापक अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी २१ जानेवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. प.पू. महाराज ३ दिवसांपासून शहरातील व्याख्यानमालेत मार्गदर्शन करत आहेत.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की,
१. अयोध्येतील राममंदिर पूर्णत: लोकवर्गणीतून उभारले जात आहे. भाविकांनी दिलेल्या दानातून मंदिराचे निर्माण होत आहे. श्रीराम मंदिर निर्माणात शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीने विचार केला जात आहे.
२. रामनवमीच्या दिवशी राममूर्तीवर सूर्यकिरणे पडतील अशा प्रकारे वास्तू निर्माण चालू आहे. पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून यासाठी सूचना दिल्या आहेत.
३. देशातील अनेक मंदिरांत विशिष्ट किमतीचे तिकीट घेऊन जलद आणि जवळून दर्शनाचा पायंडा आहे; मात्र अयोध्येतील श्रीराम मंदिरात असे करण्याचा विचार अद्याप तरी केलेला नाही. देवाच्या द्वारी प्रत्येक जण समान आहे.
४. जी-२०, वुमन-२० प्रमाणेच भारतात पुढील वर्षी ‘रिलिजन-२०’ परिषद होईल. यंदा ही परिषद इंडोनेशियात झाली. सौदी ते इंडोनेशिया या मुसलमान राष्ट्रांमध्ये उदारमतवाद निर्माण झाला. येथील संस्कृतीने ते प्रेरित होतात.
५. समाजसेवा करणे, हे मंदिराचे काम नाही. ते सरकारचे काम आहे; पण संस्कार करणे, हे आमचे काम आहे. यासाठी देशातील विविध भागांतील १००-१०० तरुणांच्या गटाला अयोध्या येथे बोलावून आम्ही संस्कृती शिबिर घेऊ, तसेच भारताबाहेर रहाणारे भक्त आणि त्यांची पिढी यांना संस्कृती समजण्यासाठी विशेष कार्यक्रम घेऊ.