परीक्षा हा सण असावा ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोव्यात जिल्हास्तरीय परीक्षा पे चर्चा २०२३ चित्रकला स्पर्धेचे आयोजन
पणजी, २३ जानेवारी (सप) – विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसतांना काळजी करू नये, तर तो एक सण म्हणून साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले. शिक्षण संचालनालय, गोवा शिक्षण विकास महामंडळ आणि माहिती अन् प्रसिद्धी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण गोव्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’च्या अंतर्गत रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित केलेल्या कला आणि चित्रकला स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शासन सदैव तत्पर आहे. पंतप्रधान मोदी यांना भावी पिढीची पुष्कळ काळजी आहे, जी पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’, ‘फिट इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ या उपक्रमांमधून दिसून येते. ‘एक्झाम वॉरियर’ हे पंतप्रधानांच्या पुस्तकात ३४ मंत्र आहेत, त्यांपैकी २८ विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि ६ पालकांसाठी आहेत. पंतप्रधान नेहमीच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रेरित करतात. परीक्षेला सामोरे जाण्याची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाकली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, कठोर अभ्यास करा, सिद्धता करा आणि हसत हसत परीक्षेला बसा. बक्षीस किंवा गुणवत्ता सूचीत नाव येणे महत्त्वाचा नसून प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे.’’
सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल; समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई; आमदार उल्हास तुयेकर, अलेक्सो सिक्वेरा, अनिवासी भारतीय व्यवहार आयुक्त अधिवक्ता नरेंद्र सवाईकर, गोवा शिक्षण विकास महामंडळाचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उत्कृष्ट कलाकार आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त ब्रह्मानंद शंखवाळकर आदी उपस्थित होते.
या वेळी वरिष्ठ कला योद्धा आणि उत्कृष्ट कला योद्धा या श्रेणीतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार दिले. तत्पूर्वी पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रह्मानंद शंखवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.