हिलटॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेला स्फोट गॅस गळतीमुळे ! – उपअधीक्षक जीवबा दळवी
म्हापसा, २३ जानेवारी (वार्ता.) – डांगी कॉलनी, म्हापसा येथे रविवारी झालेला स्फोट हा निव्वळ गॅस गळतीमुळे झालेला आहे, असा निष्कर्ष अग्नीशमन दलाच्या तज्ञ अधिकार्यांनी काढलेला आहे, असे सांगून उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी या स्फोटामागील घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. प्रचंड मोठ्या आवाजाच्या या स्फोटामुळे म्हापसा परिसर हादरून गेला होता.
म्हापसा अग्नीशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले की, या स्फोट प्रकरणाचे अन्वेषण पुन्हा करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिले.
त्यानंतर पोलिसांनी आणि अग्नीशमन दलाने पुन्हा अन्वेषणाचे काम केल्यानंतर हा स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचे उघड झाले आहे. कालपर्यंत गॅस गळती, वातानुकूलन यंत्रणेची गॅस गळती आणि शीतकपाटाच्या कॉम्प्रेसरचा स्फोट या ३ शक्यता वर्तवण्यात येत होत्या; पण आज अग्नीशमन दलाबरोबर केलेल्या एकत्रित पहाणीनंतर हा स्फोट गॅसगळतीमुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
अग्नीशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक सिलिंडरचा वापर न करता घरगुती गॅस सिलिंडर वापरण्यात येत होते, तसेच या सिलिंडरला लावलेले रेग्युलेटर आणि पाईप आयएस्आय मानांकन असलेले आणि अधिकृत आस्थापनाचे नव्हते. ज्या वेळेस स्फोट झाला, त्या वेळेस अग्नीशमन दलाला गॅसचा रेग्युलेटर चालू असल्याचे आढळले होते. शेगडीजवळ जोडण्यात आलेल्या गॅसच्या नळीचा काही भाग फुटलेला होता, त्यामुळे तेथून गॅसगळती होत होती. हा गॅस बारमध्ये पसरल्यामुळे त्याचा दबाव निर्माण झाला आणि आतील शीतकपाट चालू असल्याने त्याचा विजेशी संपर्क येऊन उष्णतेमुळे तो शटरद्वारे बाहेर फेकला गेला, असे बॉस्को फेर्राव यांनी सांगितले. त्यानंतर गॅसची गळती कशा पद्धतीने होत होती, याचे प्रात्यक्षिक अग्नीशमन दलाच्या जवानांनी दाखवले. (गॅस सिलिंडचा वापर नियमाप्रमाणे न करणार्या रेस्टॉरंटवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
Strict action against anyone responsible for Mapusa gas leak blast incident: #Goa @goacm @DrPramodPSawant https://t.co/70EUs0cEVB @Goa_Cops
— Goemkarponn (@goemkarponnlive) January 23, 2023
म्हापसा येथील स्फोटाच्या घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी – डांगी कॉलनी म्हापसा येथील भीषण स्फोटाच्या घटनेकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन लक्ष देत आहे. या दुर्घटनेला जे कुणी उत्तरदायी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ जानेवारीला दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘ही एक गंभीर घटना आहे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा घटना हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे.’’
स्फोटाविषयी संशयास्पद काही नाही ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक
स्फोटाच्या तपासणीत सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही घटना घडली. तो घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होता. त्यात काहीही संशयास्पद नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस महासंचालक यांनी केले आहे.
हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाने या घटनेत घातपाताचा हेतू असल्याचा आरोप केला होता आणि या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. बार अँड रेस्टॉरंट चालवत असल्याबद्दल परिसरातील रहिवासी त्यांच्या विरोधात असल्याचा आरोप रेस्टॉरंटच्या मालक मयेकर यांनी केला होता. २२ जानेवारीला पहाटे ५ वाजता घडलेल्या या स्फोटात बार अँड रेस्टॉरंटसह, जवळपास ७ सदनिका आणि १ बंगला, ३ चारचाकी अन् ३ दुचाकी गाड्यांची हानी झाली आहे.