आठवणी सुभाषबाबूंच्या !
काल २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती झाली. त्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या माझ्या आठवणी येथे देत आहे.
१. सुभाषचंद्र बोस यांचे बालपण आणि शालेय शिक्षण
‘सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानकीनाथ आणि प्रभावतीदेवी या दांपत्याच्या पोटी २३ जानेवारी १८९७ या दिवशी कटक येथे झाला. या दांपत्याला ८ पुत्र आणि ६ कन्या होत्या. सतीशचंद्र, शरदचंद्र, सुरेशचंद्र, सुधीरचंद्र आणि सुनीलचंद्र, हे सुभाषबाबूंचे ५ मोठे भाऊ होते आणि या ५ मुलांनंतर या दांपत्याला ३ कन्यारत्ने झाली. त्यानंतर सुभाषबाबूंचा जन्म झाला. सुभाषबाबूंनंतर जानकीनाथ आणि प्रभावतीदेवी यांना २ मुलगे अन् ३ मुली झाल्या. शैलेशचंद्र आणि संतोषचंद्र हे सुभाषबाबूंचे दोन लहान भाऊ होते.
सुभाषबाबूंमध्ये वडिलांची सोशिकता आणि मातेची नीतीमत्ता हे दोन गुण विशेषत्वाने आढळतात. सुभाषबाबूंचे संपूर्ण बालपण कटकमध्ये गेले. त्यांचे शालेय शिक्षण ‘प्रोटेस्टंट युरोपियन स्कूल’ या बाप्टिस्ट मिशनने चालवलेल्या मिशनरी शाळेत झाले. त्या शाळेत बंगाली आणि उडिया भाषिक शिक्षक होते. शाळेचे मुख्याध्यापक वेणीमाधव दास यांच्याशी सुभाषबाबूंची अधिक जवळीक झाली. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सुभाषबाबूंवर प्रभाव पडला. काही दिवसांतच वेणीमाधव दास यांचे दुसर्या ठिकाणी स्थानांतर झाले. त्यामुळे सुभाषबाबूंना दुःख झाले. नैतिक शिक्षण देणारे प्रेमळ शिक्षक आपल्यापासून लांब जात आहेत, याचे विद्यार्थ्यांना वाईट वाटले. विद्यार्थ्यांचा निरोप घेतांना मुख्याध्यापक म्हणाले, ‘‘मला आणखी काही सांगायचे नाही, केवळ परमेश्वराने तुम्हा सर्वांवर आपला वरदहस्त ठेवावा, एवढीच प्रार्थना करायची आहे.’’ त्यांच्या मुखातून हे शब्द निघताच सुभाषबाबूंच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
वर्गातून बाहेर आल्यावर त्यांना तेथेच उभे असलेले त्यांचे शिक्षक दिसले. त्यांना पहाताच सुभाषबाबूंच्या डोळ्यातील अश्रू वेगाने वाहू लागले. मुख्याध्यापक वेणीमाधव यांचीही अवस्था सुभाषबाबूंप्रमाणेच झाली होती. ते सुभाषबाबूंना म्हणाले, ‘‘अरे वेड्या, आपण शाळेत भेटलो नाही, तरी आपली भेटू होऊ शकते.’’ मुख्याध्यापकांनी त्यांचा शब्द खरा केला. पत्राद्वारे शिक्षक आणि छात्र (विद्यार्थी) एकमेकांना भेटत राहिले. एका पत्रातून वेणीमाधव सुभाषबाबूंना लिहितात, ‘‘निसर्गाशी तू संपूर्णतः एकरूप हो आणि त्याला तुझ्याशी संवाद साधू दे. त्यामुळेच तुझे मन शांत आणि आनंदी होईल. तो निसर्गच तुला इच्छाशक्ती देईल.’’
२. सुभाषबाबू यांची आध्यात्मिक जडणघडण
निसर्गसौंदर्यात रंगून जाणार्या सुभाषचंद्रांना कालिदास आणि वर्ड्सवर्थ यांच्या काव्यातील निसर्गवर्णनाचा आनंद घेता येऊ लागला. त्यांची संस्कृत भाषेतही उत्तम प्रगती झाली. सुभाषबाबू त्यांच्या शाळेत शिकत असतांनाच त्यांना स्वामी विवेकानंद यांचे ग्रंथ त्यांच्या नातलगांकडे पहाता आले. ते ग्रंथ उत्सुकतेने त्यांनी वाचले. त्या ग्रंथामुळेच मातृभूमी ही त्यांच्या प्रेमाची राणी झाली. रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते. ‘लालसा आणि पैसा यांची ओढ सोडून द्या’, हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया होता. त्या पायावर सुभाषचंद्र बोस यांची जीवन इमारत उभी राहिली. वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्यावर असे संस्कार झाले. या संस्कारातून त्यांच्या जीवनाची जडणघडण झाली.
रात्री अंधारात सुभाषबाबू ध्यान करत असत. एकदा ते असेच अंधारात ध्यान करत असतांना त्यांच्या घरात काम करणारी बाई त्यांना अडखळली. अंधारात कोण बसले आहे, हे पहाण्यासाठी तिने दिवा आणला. त्या दिव्याच्या प्रकाशात सुभाषबाबूंना ध्यानावस्थेत पाहून तिला आश्चर्य वाटले. वयाच्या १६ व्या वर्षी सुभाषबाबूंना समाजसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. ते गरिबांच्या वस्तीत जाऊ लागले. तिथल्या गरिबांना शक्य तेवढे साहाय्य करू लागले. हळूहळू संघटक म्हणून त्यांचे सामर्थ्य प्रकट झाले. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीचे धडे घेऊन लोकहितासाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले.
३. सुभाषबाबू यांच्यात राष्ट्रभक्तीचे बीज रोवले जाण्याची प्रक्रिया
देशात घडत असलेल्या राजकीय घटनांकडे ते सजगतेने पहात होते. वर्ष १९०८ मध्ये खुदीराम बोस यांनी फेकलेला बाँब, स्वदेशीची चळवळ आणि बंगालच्या फाळणीच्या विरोधी चाललेली चळवळ या घटनांना शाळेतील शिक्षकांनी विरोध केला होता. त्याचा काहीसा परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्यामुळे डिसेंबर १९११ पर्यंत, म्हणजे वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत ते ज्वलंत देशभक्त झाले नव्हते. वर्ष १९१२ मध्ये एका राजकीय चळवळ करणार्या गटाचा म्होरक्या असलेला एक तरुण विद्यार्थी कटकला आला. तो सुभाषबाबूंचे मुख्याध्यापक वेणीमाधव दास यांना भेटला होता. त्या दोघांमध्ये स्वदेशीसंबंधी चर्चा झाली. त्याचा प्रभाव सुभाषबाबूंवर पडला आणि ते राष्ट्रीय कार्यात सहभागी झाले. अनेक वर्षे त्या राजकीय गटाशी त्यांचा संबंध राहिला. असे असले, तरी त्यांचे अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. त्यांची पाठांतर शक्ती दांडगी होती. विविध ग्रंथांच्या वाचनाने त्यांची बौद्धिक दृष्टी विस्तारली होती. तसेच ते बहुश्रुत होते. स्वदेशासंबंधीच्या वाङ्मयाचे त्यांनी बरेच वाचन केले. बंगाली कवींच्या अनेक कविता त्यांना मुखोद़्गत होत्या. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन त्यांच्या मनात राष्ट्र्रभावनेचे बीज रोवले गेले.
४. अतिशय तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे वरदान लाभलेल्या सुभाषचंद्र बोस यांचे जीवन राष्ट्राला अर्पण !
सुभाषबाबू यांनी मार्च १९१३ मध्ये शालांत परीक्षा दिली. या परीक्षेत ते विद्यापिठात दुसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एकदा शिक्षकांनी त्यांना विचारले, ‘‘व्हॉट इज द डिफरन्स बिट्वीन स्कूल मास्टर अँड स्टेशन मास्टर ?’’ (शाळा मास्तर (शिक्षक) आणि स्टेशन मास्तर यांच्यात काय भेद आहे ?) सुभाषबाबूंनी तात्काळ उत्तर दिले, ‘‘स्कूल मास्टर ट्रेन्स माईंड अँड स्टेशन मास्टर माईंड ट्रेन्स.’’ (शाळेतील शिक्षक मनाला घडवतात आणि स्टेशन मास्तर गाड्या सांभाळतात.) सुभाषबाबू राजकीय चळवळीत सहभाग घेणार्या लोकांच्या सहवासात असल्याचे त्यांचे वडील जानकीनाथ यांना कळले. त्या वेळी त्यांनी सुभाषबाबूंना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोलकाता येथे पाठवले. ते कोलकाता येथे जाण्यापूर्वीच त्यांच्या बुद्धीमत्तेची कीर्ती कोलकातापर्यंत पोचली होती.
सुभाषबाबूंचे जवळचे मित्र दिलीपकुमार रॉय सुभाषबाबूंची एक आठवण सांगताना म्हणाले, ‘‘वर्ष १९१३ मध्ये मी ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थापन केलेल्या ‘मेट्रोपॉलिटीन इन्स्टिट्यूशन’ या शाळेत मॅट्रिक्युलेशनच्या (‘एस्.एस्.सी.’च्या) वर्गात होतो. विद्वान बुद्धीमंत खितीश चॅटर्जी आमच्या वर्गात पहिले विद्यार्थी होते. एक दिवस अचानक कटकच्या निबारन नावाच्या मित्राने आम्हाला धक्का दिला. आम्ही सर्वजण म्हणत होतो की, ‘खितीश हा परीक्षेत पहिला येईल’; पण आता निबारन म्हणाला, ‘‘कटकच्या आमच्या रावेनशॉ शाळेतील एक रत्न आहे, जानकीनाथ बोस यांचा मुलगा सुभाष ! तो त्याच्यावरही मात करील.’’ आम्ही सारे त्यावर छद़्मी हसलो, तर त्याने त्याची टरच उडवली. तो बंगालीत म्हणाला, ‘‘मी काय म्हणतो ते लिहून ठेव, मग पुढे पाहू.’’ एका बाजूच्या ओडिशातील कटकचा विद्यार्थी खितीशवर मात कशी काय करील ? त्याने तर त्याच्या वडिलांनी तपासून आणि सुधारून दिलेले ९० अप्रतिम निबंध पाठ केले होते. त्याला इंग्रजीत ९० टक्के गुण मिळत असत. मी हे अभिमानाने सांगत होतो; पण पुढे चमत्कार घडला. सुभाषचा क्रमांक ‘मेट्रो इन्स्टिट्यूशन’च्या प्रथम सरकार नावाच्या विद्यार्थ्यानंतर दुसराच आला.
निबारन त्या वेळी हसून म्हणाला, ‘‘आता काय?’’ आणि तेव्हापासून सुभाष हे रत्न माझे तात्काळ आवडते झाले.’’
अशा या अत्यंत हुशार आणि प्रामाणिक असलेल्या सुभाषबाबूंनी स्वतःचे जीवन राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले. भारतमातेच्या हातापायातील पारतंत्र्याच्या शृंखला तोडून टाकण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. अशा या भारतमातेच्या वीर आणि बुद्धीमान सुपुत्राला विनम्र अभिवादन!’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (२३.१.२०२३)