परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याविषयी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. रजनीगंधा कुर्हे यांना आलेली अनुभूती आणि मनाची झालेली विचारप्रक्रिया !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हा एक देह नसून ईश्वरी तत्त्व आहे आणि स्वतःचे आत्मतत्त्व त्यांच्यातील ईश्वरी तत्त्वाशी एकरूप होत आहे’, अशी शब्दांपलीकडील स्थिती अनुभवता येणे
‘२७.१२.२०२१ या दिवशी सायंकाळी नामजपादी उपाय करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण आली. माझ्या देहात त्यांना सूक्ष्मातून अनुभवत असतांना ‘तेे एक ‘ईश्वरी तत्त्व’ आहे आणि माझ्यातील अंतरात्म्याचे तत्त्व त्यांच्यातील ईश्वरी तत्त्वाशी एकरूप होत आहे’, असे माझ्या अंतर्मनाला अनुभवता येत होते. ती स्थिती शब्दांपलीकडील होती.
२. ‘ईश्वरावरील प्रेम हे मोक्षाहून अधिक सुंदर आहे’, असे वाटणे
काही मिनिटांनंतर माझ्या मनात आपोआप विचार आला, ‘ईश्वराची विविध रूपे आहेत. ‘हिंदु राष्ट्र’ हे त्यातील समष्टी रूप आहे. देवाशी एकरूप होण्याच्या प्रक्रियेत ‘देवावर प्रेम करणे’, ही प्रक्रिया मला सर्वाधिक सुंदर आणि शांतीदायक वाटली; कारण तेव्हा ‘ईश्वरावरील प्रेम हे मोक्षाहून अधिक छान आहे’, असे वाटले.
३. ‘प्रवासाला बाहेर जातांना वेगवेगळ्या स्थानकांचा आनंद घेत व्यक्ती पुन्हा पुढच्या प्रवासाला लागते, तशी ईश्वराकडे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया आहे’, असे वाटणे
आपण बाहेर प्रवासाला जातांना विविध स्थानके लागतात. त्या प्रत्येक स्थानकाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. आपण त्या वैशिष्ट्यांचा केवळ आनंद घेतो. त्या ठिकाणांची निर्मिती करणार्या ईश्वराची लीला अनुभवतो आणि पुन्हा आपल्या ठरलेल्या प्रवासाकडे आपली दृष्टी स्थिरावते. तेव्हा मनात विचार येतो, ‘आपल्याला आपल्या इच्छित स्थानी पोचण्यास किती वेळ लागणार आहे ?’ अगदी त्याचप्रमाणे ‘आपत्काळ’, ‘हिंदु राष्ट्र’ ही सगळी देवाची एक लीला आहे. ईश्वराने ठरवलेल्या वेळी सगळे होणारच आहे. मला यातून केवळ देवाकडे जाता येण्यासाठी, देवाला अपेक्षित असे घडता येण्यासाठी सदैव सिद्ध रहायचे आहे; कारण मला घडवणारा तोच ईश्वर विविध रूपांतून माझ्यासमोर उभा आहे. प्रतीक्षा आहे, ती केवळ मला त्या त्या वेळी त्या त्या रूपात समोर आलेल्या ईश्वराला अचूक ओळखता येण्याची !
४. प्रार्थना
वरील विचार मनात आल्यावर आपोआपच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना झाली, ‘आपणास मी कितीही जाणले, तरी ते अपूर्ण आहे. आपण अनंत आहात. आपल्या चरणांशी येण्यासाठी आपणच मला मार्ग दाखवून त्या मार्गी मार्गस्थ होण्याची शक्ती द्या आणि आपल्या चरणी एकरूप करून घ्या ! आपले चरण हेच आम्हा साधकांचे परम धाम आहे. इथूनच प्रारंभ आणि इथेच अंत आहे. ‘मार्गक्रमण करतांना मी कधी हरवले, तरी आपण माझा हात धरून आपल्या चरणी घ्याल’, याची मला निश्चिती आहे. ‘आपल्या भक्तीतच आपल्या आशीर्वादाची शक्ती आहे !’, हा अनुभव आपण अनेकदा मला दिला आहे. ‘ही भक्ती मला लाभावी, अशी आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना करीत आहे.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |