छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ न म्हणण्यामागील कावा ओळखायला हवा !
सध्या महाराष्ट्रात सामाजिक विद्वेष उफाळून आला आहे. काही दिवसांपूर्वी संपलेल्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात ‘छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणण्याची आवश्यकता नाही. ते स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते’, अशा आशयाचे विधान विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. स्वाभाविकच याचे पडसाद उमटू लागले. अजित पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी स्वत:ला इतिहासकार म्हणवून घेणारे काही जण मैदानात उतरले. सोशल मिडियावर (सामाजिक माध्यमांवर) दोन्ही बाजूंनी तुंबळ युद्ध चालू आहे. यानिमित्ताने ऐतिहासिक पुराव्यांपासून ते तथाकथित नवइतिहासकारांच्या भूमिकांपर्यंत सारे काही सोशल मिडियावर भरभरून उपलब्ध होत आहे. ‘इतिहास हा इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणून समजून घेतला पाहिजे’, याचेच भान आपण हरवून बसलो आहोत. सर्व गोष्टी राजकीय चष्म्यातून पहाण्याची व्याधी आपणास जडली आहे. त्यामुळे राजकारणातून आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनाही सोडायला सिद्ध नाही.
१. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेवर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे अनाकलनीय विधान
अजित पवार बोलले, पाठोपाठ मुंब्य्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलले. या मंडळींसाठी इंद्रजित सावंत ऐतिहासिक पुरावे सादर करू लागले. अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याच विषयावर भाष्य केले. एका बाजूला ‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नाहीत’, असे मांडणारा, म्हणजे अजित पवारांची पाठराखण करणारा गट, तर दुसरीकडे या गटाचे वैचारिक वाभाडे काढणारा ‘छत्रपती संभाजी महाराज प्रेमी गट’, यांची सोशल मिडियावर साठमारी चालू होती. असे होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे अजित पवार, आव्हाड, सावंत, कोल्हे इत्यादींची अडचण झाली आहे. ‘आपण बोललो त्यावर ठाम रहावे ? कि शरद पवार यांनी घेतलेली भूमिका स्वीकारून त्याप्रमाणे स्वत:ला दुरुस्त करावे’, हेच या मंडळींना कळत नाही.
धर्मवीर संभाजी महाराज या विषयावर बोलतांना शरद पवार म्हणाले, ‘‘संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणणे वावगे नाही. धर्मवीर काय ? किंवा धर्मरक्षक काय ? ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांनी धर्मवीर म्हणावे. ज्याला ‘स्वराज्यरक्षक’ म्हणायचे आहे, त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणावे. त्यांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले, त्याची आपण नोंद घेतल्यास चुकीचे नाही. त्यांच्यावरून वाद करण्याची आवश्यकता नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको.’’
शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘अजित पवार वक्तव्य मागे घेणार का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो; मात्र तशी शक्यता अजिबात नाही. अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात बोलले असल्यामुळे त्यांचे वक्तव्य सभागृहाच्या कागदपत्रांमध्ये नोंदवले आहे. कदाचित् शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार सभागृहाच्या बाहेर आपले वक्तव्य मागे घेतीलही; मात्र सभागृहात झालेल्या नोंदीचे काय ? हा प्रश्न शिल्लक रहातोच.
२. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या जाणार्या वक्तव्यांमागील उघड गुपित
शरद पवार यांनी जरी वरवरची समन्वयाची भूमिका घेतली असली, तरी मूळात त्यांना काय अपेक्षित आहे ? हे समजून घेतले पाहिजे. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा अभ्यास केला, तर विरोधाभासी वक्तव्य ते नेहमी करतात. स्वत: शरद पवार यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणण्याची आवश्यकता नाही’, असे विधान केले होते. शरद पवार यांच्या नंतर जितेंद्र आव्हाड यांनी ‘अफझलखान त्यांच्या (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या) राज्याच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आला होता’, असे विधान केले होते. तेच आव्हाड आता औरंगजेबाचे गुणगान गाण्यात रममाण झाले आहेत. आव्हाड औरंगजेबाचे महिमामंडन करतांना नवा इतिहास सांगत आहेत. हे दोघे असे का बोलतात ? हे उघड गुपित आहे. अशी वक्तव्य करण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे मुसलमानांचे लांगूलचालन आणि दुसरे कारण हिंदु अस्मितेवर घाला घालणे.
पवार यांना हिंदु अस्मितेचे कायम वावडे आहे. हिंदु समाजाला उपदेश करतांना ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाचा उद़्घोष करतात आणि हिंदु धर्म, परंपरा अन् संस्कृती यांवर टीका करतांना दिसतात; मात्र त्यांची ही टीकेची तोफ मुसलमान समाजावर कधीही डागली गेली नाही. उलट ‘पवित्र कुराणाच्या आदेशानुसार मुसलमान समाजाला जगता यावे’, असा ते आग्रह करत असतात. ‘मुसलमान समाज हा राज्यघटनेच्या कक्षेत येत नाही’, असे ते अप्रत्यक्षपणे सुचवत असतात. या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म, अस्मिता यांच्याविषयी उठवळपणा करण्यामागे काय उद्देश आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
३. हिंदूंच्या राष्ट्रपुरुषांवर आघात करत अस्मिताहीन हिंदु समाज निर्माण करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्रात एकूणच हिंदु अस्मिता आणि महापुरुष यांच्या अवमूल्यनाची जरी होड लागली असली, तरी त्यामागे सूत्रधार कोण आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे. मागील २-३ दशकांपासून महाराष्ट्राचा इतिहास जातीय स्वरूपात मांडण्यास प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ एका जातीपुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न चालू झाला आणि त्याची ‘बहुजन विरुद्ध ब्राह्मण’, अशी परिणती झाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे मुसलमानांच्या विरुद्ध लढले नाहीत, तर ब्राह्मणांच्या विरुद्ध लढले’, अशा प्रकारची मांडणी केली गेली. त्यासाठी अनेक नवइतिहासकार उभे केले आणि ‘त्यांनी लिहिलेले साहित्य हाच खरा इतिहास आहे’, असा आभास निर्माण केला गेला. आता याच मार्गाने पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात हिंदु समाजाला वाटणारे प्रेम, श्रद्धा यांच्यावर आघात करत अस्मिताहीन निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. ‘छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणू नका’, असे विधान करणे, हा या प्रयत्नांचाच भाग आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
४. ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्यासह पुढील पिढीला खरा इतिहास सांगणे आवश्यक !
हिंदु समाज श्रद्धाहीन झाला की, आपोआपच तो धर्महीन होईल. त्यामुळे ‘हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान असेल, त्यावर आघात करा. इतिहासाची मोडतोड करून धर्म आणि संस्कृती यांपासून महापुरुषांना दूर करा’, ही कार्यपद्धत अवलंबून महाराष्ट्रात सामाजिक पातळीवर वाद निर्माण केले जात आहेत. त्यामुळे ‘हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तो स्वतःचा इतिहास, धर्म अन् संस्कृती यांपासून दूर लोटला जाईल’, अशी योजना करून जाणीवपूर्वक वाद निर्माण केले जात आहेत. या वादातून तात्कालिक स्वरूपात समाजमन अस्वस्थ होत असले आणि ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी यातून मार्ग निघणार नाही. सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडल्या जातील. ‘आज ही मंडळी महापुरुषांचा अवमान करत असली, तर त्यांचे लक्ष्य हिंदु धर्म आणि संस्कृती आहे’, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात तात्काळ उत्तर देतांनाच पुढील पिढी या भ्रमजाळात फसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना खरा इतिहास सांगावा लागेल.
– श्री. रवींद्र गोळे (साभार : साप्ताहिक ‘विवेक’, ४.१.२०२३)
संपादकीय भुमिकाहिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करून दुफळी माजवण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवायला हवा ! |