गोवा : आध्यात्मिक केंद्र !
झारखंड येथील ‘सम्मेदजी शिखर’ या जैन धर्मियांच्या तीर्थक्षेत्राला अधिकृत ‘तीर्थस्थळ’ म्हणून घोषित करण्याचीही मागणी होत आहे. याच धर्तीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याला ‘आध्यात्मिक पर्यटन केंद्र’ म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा केली आहे. हे एक चांगले पाऊल म्हणायला हवे. यामुळे देशाला आणि जगभरातील हिंदूंना गोवा हे ख्रिस्ती राज्य नसून हिंदूबहुल आणि आध्यात्मिक संस्कृती जपणारे राज्य असल्याचे लक्षात येईल. सरकारही त्याच दृष्टीने यासाठी प्रयत्न करणार आहे, असेच लक्षात येते. आतापर्यंत गोवा म्हटले की, समुद्रकिनारे, मद्यपान, अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, सनबर्न सारखा संगीत रजनी कार्यक्रम आदींमुळेच ओळखला जात आहे. गोव्याची ही अपकीर्तीची ओळख पुसून गोवा हे हिंदु राज्य आहे आणि तेथे गोमंतकियांनी धर्माभिमान राखत गोव्याची संस्कृती जपली आहे, हे आता गोवा सरकारला आध्यात्मिक पर्यटन केंद्राद्वारे देशाला सांगायचे आहे. सरकार ते करणारच, अशीच हिंदूंना आशा आहे.
खरे धर्माभिमानी गोमंतकीय !
गोव्यावर पोर्तुगिजांनी ५०० वर्षे राज्य केल्यानंतरही आज गोव्यात हिंदु बहुसंख्य आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी पोर्तुगिजांनी जो काही हिंदूंचा अनन्वित छळ केला, तो इतिहास आज देशातील कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवला जात नाही, ही भारतीय धर्मनिरपेक्षतेने देशाची केलेली मोठी हानी आहे. सत्य इतिहास दडपणे याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाहीत, हे आता जनतेने लक्षात घ्यायला हवे. गोव्याला आध्यात्मिक केंद्र बनवतांना हा इतिहासही सांगावा लागणार आहे. यातून गोमंतकीय हिंदूंनी त्यांचा धर्म, मंदिरे, तीर्थस्थळे, सण, परंपरा, तसेच निसर्ग यांची जपणूक कशी केली ? ते आहे त्याच स्थितीत कसे ठेवले ? हे भारतियांच्या लक्षात येईल. पोर्तुगिजांमुळे ५०० वर्षांपूर्वी अनेक मंदिरे एका गावातून दुसर्या ठिकाणच्या गावांत कशी स्थानांतरित करावी लागली ? हा इतिहास सांगावा लागणार आहे. किती मंदिरे पाडून तेथे चर्च उभारण्यात आली ? हेही दाखवावे लागणार आहे. तरच याचे गांभीर्य, महत्त्व लक्षात येण्यासह गोमंतकियांचा धर्माभिमान देशाला समजेल. जे दारू पिण्यासाठी, अमली पदार्थाचे सेवन करण्यासाठी, वेश्यागमन करण्यासाठी येतात, त्या कथित पर्यटकांना गोमंतकियांच्या त्यागाची, संघर्षाची, हिंदुत्वाची जाणीव होईल. अनेक भारतियांना वाटते की, गोव्यातील लोक म्हणजे सकाळी उठल्यापासून दारू पिणारे, मासे खाणारे, तोकड्या कपड्यात रहाणारे असे आहेत. जेव्हा पर्यटक गोव्यात येतात, तेव्हा त्यातील अनेकांना वास्तव किती वेगळे आहे ? हे लक्षात येते. हेच वास्तव गोव्यात न आलेल्यांना आता सांगावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यामुळे आज गोमंतक संपूर्ण ख्रिस्ती राज्य होण्यापासून वाचलेला आहे. त्यांच्या कार्याचीही माहिती सांगावी लागणार आहे.
मंदिरे अद्यापही भक्तांच्या कह्यात !
आध्यात्मिक पर्यटन केंद्राचा मुख्य भाग हा गोव्यातील मंदिरेच असणार, हे वेगळे सांगायला नको. गोव्यात शेकडो वर्षे प्राचीन मंदिरे आहेत. गोव्यातील प्रसिद्ध मंगेश देवस्थान, हे गानकोकिळा लता मंगेशकर यांचे कुलदैवत आहे. यांसह महालसा मंदिर, श्री शांतादुर्गा मंदिर, श्री कामाक्षी मंदिर, श्री नवदुर्गा मंदिर आदी अनेक मंदिरे जागृत आहेत. ती भक्तांच्या हाकेला ‘ओ’ देणारी आहेत. त्याची अनुभूती भक्त घेत असतात. संपूर्ण देशात मंदिरांचे सरकारीकरण झालेले असतांना गोव्यातील मंदिरे भक्तांच्या (महाजनांच्या) नियंत्रणात आहेत आणि त्यांचे व्यवस्थापन अगदी भावपूर्ण अन् शिस्तीने होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मंदिरांमध्ये विदेशी ख्रिस्ती, तसेच भारतीयही दर्शनासाठी तोकड्या कपड्यात येत असतांना अनेक मंदिरांनी त्यांच्यासाठी वेशभूषेची नियमावली बनवली आहे. तोकड्या कपड्यांत येणार्या या पर्यटकांना आता पूर्ण कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात असल्याने त्याचे व्यवस्थापन कसे चालते ? याचे उत्तम उदाहरण गोव्यातील देवस्थानांनी देशासमोर ठेवले आहे. याचा अन्य राज्यांतील सरकार, प्रशासन आणि भाविक यांनी अभ्यास केला पाहिजे. इतकेच नव्हे, तर देवस्थानचे व्यवस्थापन करणारे हे एखाद्या ‘कार्पोरेट’ आस्थापनांप्रमाणे नाही, तर भक्त म्हणून मंदिरांचे व्यवस्थापन पहातात आणि गोमंतकीयही मंदिरांमध्ये त्याच भावाने जातात अन् तेथील पावित्र्य टिकवून ठेवत आहेत. गोव्यातील मंदिरांमध्ये स्वच्छतेविषयी काळजी घेतली जाते, हे येथे आलेल्यांनी पाहिलेच असेल. ‘जेथे स्वच्छता असते, तेथे ईश्वराचा वास असतो’, हे नेहमीच लक्षात घ्यायला हवे. ‘काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या ठिकाणी पूर्वी नेहमीच अस्वच्छता असायची’, हे म. गांधी यांनी १०० वर्षांपूर्वीच सांगून ठेवले होते आणि पंतप्रधान मोदी यांनीही हे लक्षात घेऊन या मंदिराच्या परिसराचा कायापालट केला, हे आपण आज पहातच आहोत.
संत, धार्मिक संस्था आदींचे साहाय्य घ्यावे !
संत, आध्यात्मिक क्षेत्रातील उन्नत यांच्या दृष्टीने गोमंतक ही सात्त्विक भूमी आहे. येथे सात्त्विकता टिकून आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी येथील संतही कार्य करत आहेत. सरकारने अशा संतांचे मार्गदर्शन घेऊन गोव्याला आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनवावे, असेच हिंदूंना वाटते. गोव्यातील प्रसिद्ध तपोभूमी, कुंडई येथील प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी यांच्यासारख्या संतांचे कार्य पुष्कळ मोठे आहे. त्यांचा या कार्यात मोठा हातभार लागू शकतो, हे सरकारच्याही लक्षात असणार. त्याचप्रमाणे धार्मिक संस्था, संप्रदाय यांचेही साहाय्य घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्यातून सरकारची ही योजना अधिक परिणामकाररित्या फलद्रूप होईल आणि त्याचा आध्यात्मिक स्तरावर देशातील प्रत्येक हिंदूला लाभ होईल. गोव्याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.
मंदिरांचे सरकारीकरण न करता भक्तांकडून त्यांचे सुव्यवस्थापन कसे होते, हे गोव्यातील देवस्थान समित्यांकडून शिका ! |