दारूबंदी असणार्‍या बिहारमध्ये पुन्हा विषारी दारूमुळे ३ जणांचा मृत्यू !

सीवान (बिहार) – दारूबंदी असणार्‍या बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारू प्यायल्याने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. १२ जणांची प्रकृती चिंताजनक असून यांपैकी ६ जणांची दृष्टी गेली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर मासामध्येच बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू पिऊन ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

१. सीवान जिल्ह्यातील लकडी नवीगंज ओपी पोलीस ठाण्याच्या सीमेतील बाला आणि भोपतपूर गावांत लोकांनी विषारी दारूचे सेवन केले होते. प्रशासनाने अद्याप काहीही सांगण्यास नकार दिला आहे. पीडितांच्या कुटुंबियांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

२. या संदर्भात जिल्हा दंडाधिकारी अमितकुमार पांडे म्हणाले की, या प्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच याविषयी सांगता येईल. शेवटी इतके लोक का मरत आहेत ? आणि अनेकांची प्रकृती का बिघडत आहे ?, हा अन्वेषणाचा विषय आहे.

संपादकीय भूमिका

बिहारमधील दारूबंदी एक फार्स ठरला आहे, हे सातत्याने विषारी दारूमुळे मरणार्‍या लोकांच्या घटनांवरून स्पष्ट होते ! याला उत्तरदायी असणार्‍यावर कोण आणि कशा प्रकारे कारवाई करणार ? हाही एक प्रश्‍नच आहे !