महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथे राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्सव’ दिमाखात साजरा !
सातारा, २२ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्सव’ मोठ्या दिमाखात पार पडला. गिरीस्थान महाबळेश्वर येथील श्रीक्षेत्र महाबळेश्वराच्या मंदिरासमोरील प्रांगणात हा सोहळा पार पडला. या वेळी बाळासाहेबांची शिवसेनामधील आमदार भरतशेठ गोगावले, प्रतापगड उत्सव समितीचे मिलिंद एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी स्थानिक ज्येष्ठ मातांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचा सत्कार !
हिंदूंच्या हितासाठी अहोरात्र झटणारी संघटना असलेल्या हिंदु जनजागृती समितीचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हेमंत सोनवणे यांनी हा सत्कार स्वीकारला.
राजमाता जिजाऊ सुवर्णतुला दिन शासकीय स्तरावर साजरा करण्यासाठी प्रयत्न करणार ! – आमदार भरत गोगावले
छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता-पित्यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. माता-पित्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्याचा कारभार उत्तम प्रकारे चालवला. याच क्षेत्री ३५८ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला केली होती. ‘आजही हा महोत्सव आपण साजरा करत आहोत’, याचा मनस्वी आनंद होत आहे. हा कार्यक्रम शासकीय स्तरावर कसा साजरा करण्यात येर्ईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.