सातारा जिल्ह्यातील कृषी औषध विक्रेत्यांचा अनिश्चित काळासाठी बंद !
सातारा, २२ जानेवारी (वार्ता.) – रासायनिक खत उत्पादकांकडून दुकानदारांना होणारे लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय, त्यामुळे शासनाच्या आदेशाचे होणारे उल्लंघन, रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके यांचे नमुने अप्रमाणिक आल्यानंतर होणाऱी कारवाई यांसह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील कृषी औषध विक्रेत्यांनी अनिश्चित काळासाठी बंद चालू केला आहे. सातारा येथील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वर्ष २०२२ च्या खरीप हंगामाच्या प्रारंभीपासूनच कृषी औषध विक्रेत्यांच्या संघटनेच्या वतीने कृषीमंत्री, पुणे आयुक्त, केंद्रीय कृषीमंत्री, तसेच रासायनिक खतमंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. याची सकारात्मक नोंद घेऊन शासन निर्णय घेण्यात आले; मात्र रासायनिक खत उत्पादक स्वतःच्या लाभासाठी शासनाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करत आहेत. शेतकरी मात्र या कारणांसाठी कृषी दुानदारांना उत्तरदायी ठरवून रोष दाखवत आहेत. त्यामुळे रासायनिक खत उत्पादकांकडून शासन आणि बळीराजाची होणारी फसवणूक थांबली पाहिजे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते आपली दुकाने अनिश्चित काळासाठी बंद ठेवणार आहेत.