हिंदु धर्म सर्व मानवजातीला सामावून घेणारा ! – प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी
कुंडई, २२ जानेवारी (वार्ता.) – हिंदु धर्म हा सर्व मानवजातीला सामावून घेणारा महान धर्म आहे. ऋषीमुनींनी दिलेले संस्कार आणि सनातन हिंदु धर्माचे कार्य भावी पिढीपर्यंत पोचवले पाहिजे, असे मार्गदर्शन पद्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी यांनी केले. राजस्थान येथील श्री निळकंठ महादेव मंदिरात महाभिषेक सोहळ्याच्या वेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले.
युवाचार्य पू. अभयदास स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रख्यात कथाकार मुरलीधर महाराज यांच्या रामकथेचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विशेष निमंत्रित म्हणून व्यासपिठावर प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी यांच्यासमवेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, युवाचार्य पू. अभयदास स्वामीजी, कथाकार मुरलीधर महाराज, सद्गुरु फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड्. ब्राह्मीदेवी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘गोवा हे समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे एवढ्यापुरते मर्यादित नसून हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे’, असे प्रतिपादन केले. त्यांनी उदयपूर विमानतळावर योगऋषी रामदेवबाबा आणि जैन धर्मगुरु आचार्य लोकेशमुनी यांचीही भेट घेतली.
राजस्थान येथील श्री निळकंठ महादेव मंदिरात अभिषेक करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि समवेत प.पू. ब्रह्मेशानंदस्वामी