म्हापसा येथील ‘हिल टॉप रेस्टॉरंट’मध्ये भीषण स्फोट

रेस्टॉरंटमधील सिलिंडर आणि शीतकपाटे सुस्थितीत असल्याने घातपाताचा संशय

म्हापसा, २२ जानेवारी (वार्ता.) – डांगी कॉलनी, म्हापसा येथील हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये २२ जानेवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास शक्तीशाली स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटच्या मालकाने कुणीतरी घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस पंचनामा आणि अग्नीशमन दलाच्या वतीने अन्वेषण झाले असले, तरी या स्फोटाची विशेष ‘फॉरेन्सिक’ पथकाच्या वतीने चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. म्हापसाचे आमदार जोशुआ डिसोझा आणि नगरसेवक यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणात लक्ष घातले आहे.

या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याविषयी पोलिसांना सांगितले असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. जीवित हानी झाली नाही. सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

बार अँड रेस्टॉरंट, सदनिका, बंगला आणि वाहने यांची स्फोटामुळे हानी

स्फोट इतका तीव्र होता की, बार अँड रेस्टॉरंटसह जवळपास ७ निवासी इमारती आणि जवळचा एक बंगला, उभ्या केलेल्या ३ चारचाकी गाड्या आणि ३ दुचाकी गाड्या यांची हानी झाली आहे. निवासी इमारतीतील सदनिकांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर जवळचा बंगला आणि सदनिका यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. ५० मीटर परिसरात या स्फोटाचा धक्का जाणवला. बार अँड रेस्टॉरंटचे शटर (लोखंडी दार) पन्नास मीटर दूर उडून एका चारचाकी वाहनावर आदळले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
रेस्टॉरंटच्या मालकाने केला घातपाताचा आरोप हिल टॉप बार अँड रेस्टॉरंटच्या मालक सौ. प्रमिला मयेकर यांनी या घटनेत घातपात झाल्याचा आरोप केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या परिसरात बार ॲड रेस्टॉरंट चालवल्याबद्दल रहिवासी त्यांच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, रेस्टॉरंटची अधिक हानी झालेली नाही; परंतु शटरजवळ स्फोट झाला आणि त्याचा परिणाम जवळपासच्या भागात झाला.घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिष्ठितांच्या प्रतिक्रिया

घातपात असण्याची दाट शक्यता ! – श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, व्यावसायिक आणि गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष

हे प्रकरण घातपाती असण्याची दाट शक्यता आहे. असा भीषण स्फोट म्हापसा परिसरात पहिल्यांदाच झाला आहे. सद्यःस्थितीत हे प्रकरण साधे समजून चालणार नाही. प्रजासत्ताकदिन जवळ येत असल्याने या प्रकरणाची सरकारने गंभीर नोंद घेतली पाहिजे. नाटकापूर्वीची ही नांदी आहे. पुढे काही मोठे प्रकरण व्हायच्या आधीच प्रशासनाने जागे व्हावे.

प्रकरणाची शासनाने गंभीर नोंद यावी ! – श्री. रमेश नाईक, हिंदुत्वनिष्ठ

आज डांगी कॉलनी येथे झालेल्या स्फोटात जरी जीवितहानी झाली नसली, तरी या प्रकरणाची शासनाने गंभीर नोंद घेतली पाहिजे. कोण्या धर्मांधाने हा स्फोट घडवून आणला असू शकतो. अशा घटना घडू नयेत, यासाठी हिंदूंनी सरकारला अनेकदा निवेदने दिली आहेत; पण शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. जीवितहानी झाल्यानंतर शासन उपाययोजना काढणार का ?

अग्नीशमन दलाचे सैनिक सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोचले. तोपर्यंत बार अँड रेस्टॉरंटचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. प्रारंभी सिलिंडरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता; परंतु अग्नीशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, रेस्टॉरंटमधील दोन्ही सिलिंडर सुस्थितीत आहेत. आतील फ्रीज आणि दोन्ही ‘कोल्ड स्टोरेज’ हेही सुस्थितीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

बाँब निकामी पथकाने दिली घटनास्थळी भेट

सायंकाळी बाँब निकामी पथकाने घटनास्थळी भेट दिली. रेस्टॉरंटमधील २ सिलिंडर सुस्थितीत असल्याने हा स्फोट घरगुती वापराच्या सिलिंडरच्या स्फोटाने झाल्याचा दावा प्राथमिक अन्वेषणात फेटाळण्यात आला आहे. स्फोटाचे कारण अजूनही उलगडलेले नाही.

संपादकीय भूमिका

घटनास्थळी उशिराने उपस्थित असणारे  अग्नीशमन दल आपत्काळात कार्य कसे करणार ?