६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक हिला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असतांना तेथील साधकांकडून गुरुकृपेने पुष्कळ शिकायला मिळाले. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये परात्पर गुरु डॉक्टर यांचे तत्त्व आणि विष्णुतत्त्व सगुण प्रमाणात अनुभवायला मिळायचे, तर देवद आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर यांचेे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात अनुभवायला मिळाले. देवद आश्रमात सूक्ष्म स्तरावर शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
देवद आश्रमात असतांना तेथील वयस्कर साधक माझी प्रेमाने विचारपूस करत आणि मला प्रेमाने जवळ घेत. ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेव माझी प्रीतीने विचारपूस करत आहेत’, असेच मला वाटायचे.
२. देवद आश्रमातील अखंडत्व
अ. मला आश्रमातील कौटुंबिक भावनेतून पुष्कळ शिकायला मिळाले. ‘सर्व साधक वेगवेगळे नसून एकच आहेत’, असे मला जाणवले.
आ. गुरुदेवांनी आश्रमातून एक सूत्र प्रामुख्याने शिकवले की, देवद आश्रमात विविध कक्ष असूनही सर्व एकच आहेत आणि त्यामुळे संपूर्ण आश्रमच एक अखंड झाला आहे.
३. सेवाभाव
अ. देवद आश्रमात वयस्कर साधक पुष्कळ आहेत; परंतु सर्व वयस्कर साधक तळमळीने सेवा करतात. भोजनकक्ष आवरणे यांसारख्या सेवाही ते अत्यंत भावपूर्ण करतात.
आ. सात्त्विक उत्पादनांची सेवा चालते, तिथे सनातनची सात्त्विक उत्पादने डब्यांमध्ये भरणे, त्यांना ‘लेबल’ लावणे, त्यांचे मोठ्या खोक्यांमध्ये ‘पॅकिंग’ करणे, अशा सेवाही वयस्कर साधक पुष्कळ भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
४. गोमूत्राच्या बाटल्या भरतांना ‘प्रत्येक बाटली म्हणजे फूल असून ते गुरुचरणी अर्पण करत आहे’, असा भाव ठेवणे
एक दिवस मी सात्त्विक उत्पादन होत असलेल्या ठिकाणी साहाय्य करण्यासाठी गेले होते. तेव्हा मला गोमूत्राच्या बाटल्या मोजण्याची सेवा मिळाली. माझ्या समवेत श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टीआजोबा (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) सेवेला होते. सेवा चालू करण्यापूर्वी त्यांनी मला विचारले, ‘‘सेवा करतांना आपण कोणता भाव ठेवूया ?’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘आपण असा भाव ठेवू शकतो की, या गोमूत्राच्या बाटल्या म्हणजे फुलेच आहेत आणि ती फुले आपण गुरुचरणी अर्पण करत आहोत.’’ आम्ही तसा भाव ठेवून सेवा करू लागलो. तेव्हा ते आजोबा अत्यंत भावपूर्णपणे सेवा करू लागले. आपण जसे फुलाला अलगद गुरुचरणी अर्पित करतो, तसे आजोबा प्रत्येक गोमूत्राची बाटली अलगद पकडून दुसर्या ‘टब’मध्ये हळूवार ठेवत होते. त्यांच्याकडे पाहून ते ‘एकेक फूल गुरुचरणी अर्पण करत आहेत’, असेच मला वाटत होते. मला त्यांच्याकडून ‘सेवेप्रती भाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळाले.
५. सेवेत होणार्या चुकांची प्रेमाने जाणीव करून देणे
देवद आश्रमात असल्यावर मी सेवा करणार्यांना साहाय्य करण्यासाठी जाते. तेव्हा माझ्याकडून कधी कधी चुका होतात. तेव्हा तेथील साधक मला चुकांची अत्यंत प्रेमाने जाणीव करून देतात आणि ‘ती चूक सुधारण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयीही सांगतात.
साक्षात् गुरुदेवांनी मला देवद आश्रमात रहाण्याची संधी दिली. मला देवद आश्रमातून पुष्कळ शिकायला मिळाले, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– गुरुदेवांचे आनंदी फूल,
कु. प्रार्थना महेश पाठक, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे) (२३.५.२०२२)
|