कोल्हापूर येथे २६ ते २९ जानेवारी या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य ‘भीमा कृषी’ प्रदर्शन ! – धनंजय महाडिक, खासदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्ट्रीय म्हणून वर्ष घोषित केलेल्या तृणधान्यासाठी स्वतंत्र दालन
कोल्हापूर, २२ जानेवारी (वार्ता.) – शेतकर्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता यावे, यासाठी २६ ते २९ जानेवारी या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि भव्य असे ‘भीमा कृषी’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात येणार्या या प्रदर्शनात देश-विदेशांतील विविध नामांकित आस्थापनांचा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’ साठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेल्या तृणधान्यासाठी स्वतंत्र दालन असणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. २६ जानेवारीला दुपारी ४ वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार असून २८ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत.
२. या प्रदर्शनात ‘जिजामाता शेतीभूषण’ पुरस्कार, ‘कृषी संशोधन शास्त्रज्ञ’, ‘भीमा जीवनगौरव’, ‘कृषी रत्न’ पुरस्कार यांसह अन्य पुरस्कार दिले जाणार आहेत.
३. या प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक कक्षांचा समावेश असून भागीरथी महिला संस्थेच्या सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना विनामूल्य कक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या वेळी जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, संग्राम नाईक, सुहास देशपांडे, प्रा. जे.पी. पाटील, डॉ. शिंदे, डॉ. काटकर, सुहास देशपांडे उपस्थित होते.