स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाविषयी जाज्वल्य विचार !
आज २३ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दिनांकानुसार जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची घोषणा ‘हिंदुस्थान केवळ हिंदूंंचाच !’
‘डिसेंबर १९३७ मध्ये अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निवड झाली. त्यानंतर सलग ७ वर्षे त्यांनी हे पद भूषवले. या काळातील हिंदु महासभेच्या ७ वार्षिक अधिवेशनांत त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणांचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्र दर्शन’ या नावाने इंग्रजी आणि मराठी भाषांत प्रकाशित झाला आहे. या ग्रंथातील हिंदु राष्ट्राच्या सर्वंकष विचारांची निवडक सूत्रे पुढे देत आहोत.
अ. सावरकर यांनी सर्व जगाला समजेल, अशा भाषेत ठणकावून घोषणा दिली, ‘हिंदुस्थान हिंदूओंका, नही किसीके बापका !’
आ. ‘मुस्लिम लीग’ आणि सर्व मुसलमान समाज यांना खडसावून सांगितले, ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून आणि विरोध कराल, तर तुमचा बिमोड करून हिंदू आपल्या स्वातंत्र्यासाठी हिंदूंच्या सामर्थ्यानुसार लढतच रहातील !’
इ. हिंदुस्थानात इस्लामी राज्य स्थापण्याचा मुसलमानांचा हेतू लक्षात घेऊन त्यांनी हिंदूंना बजावले, ‘हिंदु समाजाला हिंदुस्थानचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटीश, मुसलमान आणि तत्सम विरोधी शक्ती यांच्याशी लढावेच लागेल.’
(साभार : मासिक ‘प्रज्वलंत’, ऑक्टोबर २००२, दीपावली विशेषांक)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सडेतोड प्रतिपादन
होय, हे हिंदु राष्ट्रच आहे !
‘१५.१०.२००२ या दिवशी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ प्रांगणावर पार पडलेल्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जून सांगितले, ‘होय, हे हिंदु राष्ट्रच आहे ! माझ्या हातात लष्कर द्या. मी या घातपात्यांचा पाडाव करीन. धर्मांधांना वठणीवर आणीन. हिंदूंनीही सिद्ध झाले पाहिजे. दुबळा, भ्याड आणि पळपुटा समाज असलेला देश मला मान्य नाही !’