धार्मिक स्थळे दुर्लक्षित का ?
पुणे येथील सिद्धबेट ठिकाण हे इंद्रायणीच्या काठावर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे कुटुंब रहात असलेले हे ठिकाण आहे. येथे विठ्ठलाचे ऐतिहासिक मंदिर असून ते पाण्यात आहे. एकूणच या ठिकाणाचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे; परंतु तेथील स्थिती पाहिल्यास सिद्धबेटच्या प्रवेशदाराजवळच कचर्याचे ढीग पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी हे ठिकाण मद्यपींचा अड्डा होत असल्यामुळे तेथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. प्रेमीयुगुलांचे झाडाच्या आडोशाने चालू असलेले अश्लील चाळे, जनावरांचा मुक्त संचार, भेट देणार्या पर्यटकांनी मंदिरातील भिंतीवर रेखाटलेली नावे इत्यादींमुळे या पवित्र स्थळाची दुरवस्था झाली आहे.
मंदिराच्या बाजूला कंबरेपेक्षा अधिक पाणी आहे. सद्यःस्थितीत मंदिर जलपर्णीच्या विळख्यात अडकले असून दुर्गंधीही सुटलेली आहे. या दुर्गंधीमुळे भाविकांचा ओघ घटण्यास प्रारंभ झाला असून यास सर्वस्वी प्रशासन उत्तरदायी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, तसेच मंदिराशेजारी मंदिराचा उल्लेख असणारे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सिद्धबेट पहाण्यासाठी आलेल्या भाविकांना हे मंदिर नेमके कुणाचे आहे ? याचे महत्त्व काय ? याची कोणतीही माहिती मिळत नाही.
एकूणच मंदिर आणि परिसर यांची स्थिती पाहिल्यास महान आध्यात्मिक संस्कृती असलेल्या भारतात अशी स्थिती असणे, हे संतापजनक अन् दुर्दैवी आहे. मंदिरांना हिंदु धर्माचे वैभव मानले जाते. मंदिरांतून मिळणार्या चैतन्याच्या स्रोतामुळेच मनुष्याला आणि प्राण्यांना ऊर्जा मिळत आहे, तसेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षिला जात आहे. सहस्रो वर्षांपासून हिंदु संस्कृतीचे रक्षण, जतन आणि संवर्धन यांत मंदिरांची भूमिका अनन्यसाधारण आहे. मंदिरांमुळे हिंदूंना मानसिकदृष्ट्या आधार तर मिळतोच आणि ती आध्यात्मिकदृष्ट्याही चैतन्य देऊन समस्त मानवजातीला लाभ करून देतात.
याविषयी दाक्षिणात्य मंदिरांचा आदर्श घेण्याजोगा आहे. तिथे अनेक प्राचीन मंदिरे चांगल्या प्रकारे जतन केलेली आहेत. त्यासाठी मंदिर किंवा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाऊन केवळ त्याचे छायाचित्र, ‘सेल्फी’ काढून मिरवण्यापेक्षा हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्यास मंदिरांचे वैभव जपण्यासाठी निश्चितच साहाय्य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते. हिंदु राष्ट्रात मंदिरांचा सांस्कृतिक ठेवा मोठ्या प्रेमाने आणि अभिमानाने जपला जाईल.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे