‘सक्‍सेशन डीड’ आणि ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ यांचे महत्त्व !

‘एखाद्या व्‍यक्‍तीने तिच्‍या हयातीत मृत्‍यूपत्र बनवलेले नाही आणि कर्मधर्मसंयोगाने त्‍या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला, तर त्‍याच्‍या वारसांना गोव्‍यात ‘सक्‍सेशन डीड’ आणि ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ ही २ कागदपत्रे सिद्ध करणे अत्‍यंत आवश्‍यक असते. अनेकांना ही कागदपत्रे आहेत तरी काय ? याची माहिती नसते. गंमत अशी की, ही दोन कागदपत्रे नसतील, तर मृतकाच्‍या मालमत्तेची वाटणीच काय, तर त्‍याच्‍या बँकेतील एका रुपयालाही हात लावता येत नाही. दोन्‍ही कागदपत्रे एकसारखी भासत असली, तरी ते पूर्णपणे भिन्‍न आहेत, तसेच ते मिळवण्‍याच्‍या पद्धतीही भिन्‍न आहेत.

१. आपल्‍या वारसांना सहजपणे मालमत्ता हस्‍तांतरण करण्‍यासाठी मृत्‍यूपत्र हे सर्वाधिक महत्त्वाचे कागदपत्र !  

वारसदारांना संभाव्‍य अडचणी निर्माण होऊ नयेत; म्‍हणून अनेक जण वारंवार मृत्‍यूपत्र हे नोंदणी पद्धतीने करण्‍याचा आग्रह धरतात. मृत्‍यूपत्र हे सर्वांत स्‍वस्‍त, मस्‍त आणि आरामदायक कागदपत्र आहे. यामुळे आपल्‍या वारसांना सहजपणे सर्व संपत्ती, भूमी, भूखंड, पैसे आणि गुंतवणूक उपलब्‍ध होते. आता ‘मी कुठे अजून मरणार आहे ?’, या एका विचाराने पुढे पुष्‍कळ गोंधळ निर्माण होतो आणि नंतर वारसदारांना सर्व निस्‍तरावे लागते. जेव्‍हा एखादी व्‍यक्‍ती वयाची ६० वर्षे पार करते, त्‍या वेळी मृत्‍यूपत्राचा विचार करणे अत्‍यंत आवश्‍यक असते. साधारणपणे ६५ वर्षांनंतर गुंतवणुकीचे अनेक पर्याय ज्‍येष्‍ठ नागरिक नाकारत असतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या आयुष्‍यातील नेमकी संपत्ती, पैसा आणि मालमत्ता काय आहे, याचे चित्र स्‍पष्‍ट होणे चालू होते. ते पैसे गुंतवणुकीपेक्षा कसे वापरता येतील, याचा विचार ज्‍येष्‍ठ नागरिक करत नाहीत, ही एक सामाजिक शोकांतिका आहे. मृत्‍यूपत्र न केल्‍यास पुढीलप्रमाणे संपत्तीची विभागणी होते.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

२. ‘सक्‍सेशन डीड’ आणि ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ या कागदपत्रांचे महत्त्व !  

२ अ. स्‍थावर मालमत्ता मिळवण्‍यासाठी ‘सक्‍सेशन डीड !’: यात भूमी, घर, बंगला, दुकान, गाळा, इमारती अशा हालवता न येणार्‍या गोष्‍टींचा समावेश होतो. त्‍यामुळे त्‍यांना ‘स्‍थावर मालमत्ता’, असे म्‍हणतात. ‘ट्रान्‍सफर ऑफ प्रॉपर्टी अ‍ॅक्‍ट’नुसार (संपत्ती हस्‍तांतरणाच्‍या कायद्यानुसार) कोणतीही स्‍थावर मालमत्ता एक तर ‘सेल डीड’ (विक्री करार), ‘गिफ्‍ट डीड’ (भेटवस्‍तू करार) आणि मृत्‍यूपत्र यांनुसार दुसर्‍याच्‍या नावावर देता येते. केवळ तोंडी सांगून नावावर होत नाही. सरकारी कागदपत्र बनवून योग्‍य ती ‘स्‍टँप ड्युटी’ भरल्‍यावरच ती हस्‍तांतरित करता येते.

एखादी व्‍यक्‍ती मृत झाली आणि तिने मृत्‍यूपत्र केलेले नसेल, तर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या वारसांना गोव्‍यामध्‍ये उपनिबंधक कार्यालयात (सबरजिस्‍टार ऑफिसमध्‍ये) जावे लागते आणि तेथे रितसर ‘सक्‍सेशन डीड’ करावे लागते. थोडक्‍यात मृतकाचे खरे आणि कायदेशीर वारसदार कोण आहेत ? हे सरकार सांगते अन् त्‍यावर शिक्‍कामोर्तब करते. त्‍यासाठी योग्‍य ती ‘स्‍टँप ड्युटी’, वर्तमानपत्रातील विज्ञापनांसाठी लागणारा व्‍यय, अधिवक्‍त्‍यांचे शुल्‍क आणि नोंदणी शुल्‍क असा खर्चाचा डोलारा उभा रहातो; परंतु ‘सक्‍सेशन डीड’ करणे अनिवार्यच ठरते. त्‍यात परत सर्व वारसदारांचे जन्‍माचे दाखले, विवाह प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि इतर गोष्‍टी नोंदीसाठी आवश्‍यक ठरतात. यातील एक जरी कागदपत्र नसेल, तर मग न्‍यायालयातून ‘इन्‍व्‍हेंटरी’च्‍या (मालमत्ता सूचीच्‍या) माध्‍यमातून वारसदारांची नोंद शिक्‍कामोर्तब केली जाते. या न्‍यायालयीन प्रक्रियेत साधारण ७-८ मासांहून अधिक कालावधी जाऊ शकतो. त्‍यानंतर ‘डिक्री’ (न्‍यायालयाचा निर्णय) मिळते आणि केवळ त्‍या आधारे मामलेदार कचेरीमध्‍ये १/१४ कागदपत्रांवर वारसदारांचे नाव लागू शकते. केवळ भूमी आणि अशा स्‍थावर मालमत्तेसाठीच केवळ ‘सक्‍सेशन डीड’ लागते, अन्‍यथा ‘इन्‍व्‍हेंटरी डिक्री’ उपयोगी पडते.

२ आ. जंगम संपत्ती मिळवण्‍यासाठी ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ ! : याच्‍या नावातील साध्‍यर्म दर्शवते की, मृत्‍यूपत्र न केलेल्‍या व्‍यक्‍तीचे आम्‍हीच खरे आणि कायदेशीर वारसदार आहोत. याचे प्रमाणपत्र न्‍यायालय आणि जिल्‍हाधिकारी कार्यालय संबंधित वारसदारांना देते. जंगम संपत्ती, म्‍हणजे बँकेतील विविध ठेवी, समभाग, म्‍युच्‍युअल फंड, दागदागिने ही मालमत्ता वारसदारांना मिळण्‍यासाठी सर्व बँका किंवा संस्‍था वारसदारांना ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ मागतात. वारसदारांच्‍या नावाची आणि नात्‍याची तपासणी न्‍यायालय करते, तसेच ‘गॅझेट’ आणि वृत्तपत्र यांमध्‍ये विज्ञापने देत हरकती मागवते. योग्‍य मूल्‍यांकन करून त्‍या संपत्तीची ‘स्‍टँप ड्युटी’ ठरवते. ती भरल्‍यावर वारसदारांना ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ मिळते. हे प्रमाणपत्र बँकांमध्‍ये सादर केल्‍यानंतर ‘इंडियन सक्‍सेशन अ‍ॅक्‍ट’नुसार जंगम मालमत्तेची समान वाटणी होते. या कागदपत्राला अधिवक्‍ता आणि न्‍यायालय यांचे शुल्‍क, स्‍टँप ड्युटी, वृत्तपत्र विज्ञापनाचे मूल्‍य असा व्‍यय ‘हेअरशिप सर्टिफिकेट’ मिळवण्‍यासाठी होतो.

हे दोन्‍ही अनावश्‍यक व्‍यय केवळ नोंदणी मृत्‍यूपत्र न केल्‍यामुळे वारसदारांना करावे लागतात; कारण मृत्‍यूपत्रात जंगम आणि स्‍थावर मालमत्ता यांचा अंतर्भाव करता येतो. त्‍यामुळे ही कागदपत्रे सिद्ध करण्‍याचा व्‍यय, वेळ वाचून मनस्‍ताप टाळता येतो.

– अधिवक्‍ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा. (५.११.२०२२)