देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मृत्यूंजयी नेताजी सुभाषचंद्र बोस !
आज, २३ जानेवारी या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
१. म. गांधींशी मतभेद झाल्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा वेगळा पक्ष स्थापन करणे
‘मृत्यूंजयी महामानव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवनच अत्यंत प्रेरणादायी आणि श्रेष्ठतम अशा देशभक्तीने पूर्णपणे भारलेले होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष, त्यासाठी भोगलेले कष्ट, केलेले सर्वस्व अर्पण याला इतिहासात तोडच नाही. ते काँग्रेसच्या स्वातंत्र्यास्तव पुकारलेल्या ‘अहिंसक राष्ट्रीय आंदोलना’त सामील झाले होते. असे असले, तरी ते सशस्त्र क्रांतीचे भोक्ते असल्यामुळे आणि ‘रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’, या मताचे असल्यामुळे ते म. गांधींच्या अहिंसक स्वातंत्र्य आंदोलनात पूर्णपणे सक्रीय राहू शकले नाहीत. त्यांनी वर्ष १९३८ चे हरिपुरा आणि १९३९ चे त्रिपुरा काँग्रेस अधिवेशन यांचे अध्यक्षपद भूषवले, तरी ते मनाने अन् ध्येयाने हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याकरता सशस्त्र क्रांतीचाच पाठपुरावा करत राहिले. पुढे गांधींजवळही मतभेदांनी उचल खाल्ल्यामुळे सुभाषबाबू काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यांनी मे १९३९ मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या नावाने स्वतःचा वेगळा पक्ष काढला.
२. सुभाषबाबूंनी स्वतःची सुटका आणि देशाचे स्वातंत्र्य यांसाठी वापरलेली क्लृप्ती
‘हॉलवेक स्मारक’ हटवण्यासाठी सुभाषबाबूंनी जी चळवळ प्रारंभ केली होती, ती मोडित काढण्यासाठी ब्रिटीश सरकारनेे त्यांंना कारागृहात टाकले. तेथून सुटका करून घेणे कठीण दिसताच शेवटी निर्वाणीचा उपाय शोधतांना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटकेचा प्रसंग आठवला आणि पुढे त्यांनी स्वतःच्या सुटकेसाठी कारागृहात आमरण अन्न न खाण्याचे सर्वच प्रयत्न केले. ‘सुभाषबाबूंची प्रकृती चिंताजनक झाली आहे’, असा अभिप्राय आधुनिक वैद्यांनी देताच ‘त्यांच्या मृत्यूचे दायित्व स्वतःवर येऊ नये’; म्हणून अखेर ब्रिटीश सरकारनेे त्यांना मुक्त केले. त्यानंतर त्यांच्याच घरात त्यांना स्थानबद्ध केले. अशाही स्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून ते भारताबाहेर पडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांचे शत्रू जर्मनी, इटली आणि जपान या देशांचे दौरे केले. या देशांशी ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या न्यायाने त्यांनी त्यांच्याशी संगनमत केले आणि त्यांच्या सहकार्याने लढा देण्याच्या निश्चयाने ते प्रयत्नशील झाले.
३. स्थानबद्धतेत असलेल्या सुभाषबाबूंना देशाबाहेर नेण्यासाठी आखलेली योजना
भारताबाहेर पडण्यास्तव त्यांनी अगदी एकांतवास स्वीकारला. दाढी वाढवली, भेटीगाठी घेणे बंद केले, मौन स्वीकारले, खोलीतून बाहेर पडणे बंद केले, दुसर्या कुणालाही त्यांच्या खोलीत येण्यास त्यांनी मनाई केली. त्यांचे जेवणाचे ताटसुद्धा खोलीच्या दारातून आत सारावे लागे. अशा स्थितीतून दिवस पार पडत असतांनाच त्यांनी आपले चाहते रा.स्व. संघाचे उत्तरप्रदेश प्रांतप्रचारक श्री. मुरलीधर दत्तात्रय उपाख्य भाऊराव देवरस यांच्याशी आपल्या एका अत्यंत विश्वासू सहकार्याच्या वतीने संधान साधले. त्यांना आपल्या भारताबाहेर पडण्याच्या योजनेस्तव सक्रीय होण्यास सांगितले. श्री. भाऊरावांनी या योजनेत अन्य सहकार्यांना बरोबर घेतले. त्यांनी बाबा विश्वनाथाच्या बर्फी पेढ्याच्या प्रसादात भरपूर भांग मिसळून तो प्रसाद सुभाषबाबूंवर नजर ठेवणारे गुप्तचर आणि पहारेकरी यांना तो वाटण्याची कामगिरी माझ्याकडे दिली. आवश्यकतेनुसार सुभाषबाबूंचा चेहरामोहरा मेकअपद्वारे पालटवत (ओळखू न येण्यास्तव) त्यांना काबूलपर्यंत (अफगाणिस्तान) पोचवून रशियाकडे आणि तिथून संघ स्वयंसेवकांच्या साहाय्याने जर्मनीकडे सुखरूपपणे पोचवण्याचे दायित्व देण्यात आले.
४. हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट
वरील योजना यशस्वीपणे कार्यान्वित झाली. सुभाषबाबू ‘महंमद जियाउद्दीन’ या नावाने पठाणी वेशात ‘जबलपूर’ येथील पत्ता असलेल्या ओळखपत्रासह मध्यरात्रीच्या सुमाराला घराबाहेर पडले. सुभाषबाबूंचा पुतण्या शिशिर बोस याने सिद्ध ठेवलेल्या ‘वार्डरर’ या चारचाकी वाहनात बसून आम्हा सहकार्यांसह १०० मैलांवर असलेल्या ‘गोमोह’ रेल्वेस्थानकावर पोचले. त्यानंतर ते पेशावरला जाऊन पुढे काबूलला गेले. पुढे स्वयंसेवक उत्तमचंद मल्होत्रा (सुका मेवा आणि फळ यांचे व्यापारी) यांनी इटलीच्या राजदूतांच्या सहकार्याने सुभाषबाबूंना रशियाकडे आणि तिथून जर्मनीला पोचवले. जर्मनीला हिटलरशी झालेल्या गाठीभेटीत त्याचे सहकार्य लाभले. इटलीचे सर्वेसर्वा मुसोलिनीशीही सहकार्याच्या दृष्टीने बोलणी झाली. सुभाषबाबूंनी पाणबुडीतून जपानकडे प्रस्थान केले. ‘आझाद हिंद फौज’ सिद्ध करून भारताच्या स्वातंत्र्यास्तव प्रयत्नशील असलेले महान क्रांतीकारक रासबिहारी बोस तिथे होतेच. या पुढील इतिहास सर्वज्ञात आहेच.
५. नेताजी सुभाषचंद्र यांनी ब्रिटिशांना गुंगारा देण्यासाठी ‘शारदानंद’ नाव धारण करत घेतलेला संन्यास
दुसर्या महायुद्धात जपानने पराभव स्वीकारला. त्यानंतर रशियाने सुभाषबाबूंना बंदी करून सायबेरीच्या कठोर कारागृहामध्ये डांबले. युद्ध संपताच युद्धबंदी म्हणून ब्रिटनकडे सुभाषबाबूंना सोपवण्याची प्रक्रिया होत असतांनाच त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर चीन, तिबेट, नेपाळ हे सर्व प्रांत त्यांनी साधू वेशात पार केले आणि बिहार प्रांतातील कूचबिहार येथे ‘शौलमारी’ गावात त्यांनी स्वतःचा आश्रम स्थापन करून तेथे वास्तव्य केले. त्यांनी स्वतःचे नाव ‘शारदानंद’ असे ठेवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत सावधगिरी बाळगत असत. नाही नाही म्हणता म्हणता चहूबाजूला कुणकुण पसरलीच की, ‘शौलमारी आश्रमातील शारदानंद बाबा नेताजी सुभाषचंद्र बोसच आहेत.’ मुंबईच्या ‘धर्मयुग’ या साप्ताहिकाने या बातमीचा बराच प्रचार केला. त्यांनी लिहिलेल्या संपादकीयमुळे सुभाषबाबूंचे असंख्य अनुयायी ‘शौलमारी’ आश्रमाकडे पोचू लागले; पण ‘मी नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीच.’ तोंडवळ्यात जरी साम्य असले, तरी अशा नाकारण्यामुळे त्यांचे अनुयायी निराश होऊन परतत असत. सरकारी गुप्तचरांनाही त्यांनी हेच निक्षून सांगितले, तरी त्यांनी आपली पाळत त्यांच्या भेटीस्तव येणार्या मंडळींवर ठेवलीच होती. मी श्री. भाऊराव देवरसांसमवेत वर्ष १९६० मध्ये शौलमारी आश्रमाकडे सुभाषबाबूंच्या भेटीकरता धाव घेतली होती. सुभाषबाबूंना भेटलोही आणि त्यांनी नेत्र संकेतानेच ओळख देऊन न बोलण्याचे सूतोवाच करत परतण्यास सुचवले. त्यामुळे आम्ही भेटीला आलेल्या लोकांना ‘हे नेताजी सुभाषचंद्र बोस नाहीत’, असे सांगतच आम्ही परतलो.
६. सुभाषबाबूंचा विमान अपघात आणि त्यावरून केले जाणारे राजकारण
१८ ऑगस्ट १९४५ या दिवशी सुभाषबाबूंच्या विमान अपघातातून त्यांचा मृत्यू झाला, असे म्हटले जाते. एका प्रख्यात ज्योतिषाचार्यांकडून सुभाषबाबूंच्या जन्मकुंडलीवरूनही असेच भविष्य वर्तवले गेले होते. त्यामुळे सुभाषबाबू जीवित कसे ? हा प्रश्न उद़्भवतच नाही. आज ही जगात नि भारतातही ११५, १२०, १२५ वर्षे असे आयुष्य भोगून जाणार्या लोकांविषयीचे वृत्त वर्तमानपत्रांमधून वाचायला मिळतेच. मग सुभाषबाबूंनी आपला जन्मदिवस ११० व्या वर्षी बघितला, तर त्यात नवल कसले ? ‘सुभाषचंद्र बोस हयात नाहीत’, असे दृढपणे समजणारे रशिया, अमेरिका, ब्रिटन यांच्या समवेत आपले भारत सरकारही त्यांच्या संदर्भात संग्रही असलेल्या गोपनीय धारिका वर्ष २०२० पर्यंत देण्यास सिद्ध का नाहीत ? याचा अर्थच की, त्यांना सुभाषबाबू अद्यापही जीवित आहेत, हाच विश्वास आहे. ‘युद्धबंदी’ या दृष्टीनेे त्यांना सुभाषबाबूंना फासावर लटकवण्याची अद्यापही खुमखुमी कायम आहे’, असेच समजावे लागेल, नाही का ? लॉर्ड माऊंटबॅटनने पं. जवाहरलाल यांचे कान भरले असे की, ‘सुभाषबाबू जीवित आहेत आणि ते प्रकट झाल्यास लोकाग्रहास्तव त्यांनाच तुमच्याऐवजी पंतप्रधानपद मिळेल. मग त्यांना प्रकट होण्याची संधी द्यायचीच कशाला ?’ पुढे जाऊन काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी प्रेरित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सुभाषबाबू आणि त्यांच्याशी संबंधित गोपनीय कागदपत्र ‘नेताजी सुभाषचंद्र बोस शोध आयोगा’ला देण्यास का हरकत घेतात ? तसेच त्यांनी आतापर्यंत केलेल्या शोधाला नकार देऊन पुढील शोधकार्याला स्थगिती का देतात ?
१५ फेब्रुवारी २००५ च्या भेटीत सुभाषबाबू माझ्याजवळ बोलून जातात, ‘‘सोनिया गांधी आपली नाहीच. ती आहे अमेरिका नि ब्रिटन, रशियाची ! त्या राष्ट्रांचेच भले चाहणारी. भारतियांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सुभाषबाबूंचे हे बोलणे लक्षात ठेवता डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा हा शोध खराच ठरतो की, इटालियन श्रीमती सोनिया या गांधींच्या रूपात अमेरिका, ब्रिटन नि रशिया यांची आहे. सुभाषबाबूंच्या अज्ञातवासाच्या प्रकरणात असा हा घोळ अद्यापही चालू आहेच.
७. नेताजींना मृत ठरवण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी केलेले राजकारण
येथे एक नमूद करणे योग्य वाटते की, चीन आक्रमणाची सूचना सुभाषबाबूंनी पंडित नेहरूंना दिली होती; पण ती त्यांनी ‘हिंदी चिनी भाई भाई’च्या जल्लोषात मनावर घेतली नाही. चीनला ‘विश्वसनीय मित्र’ समजण्यात आले. याही पुढे जाऊन सांगायचे, तर श्री. लालबहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून पंडित नेहरूंना हे ठाऊक होते की, सुभाषबाबू जीवित आहेत आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठीच ‘शहानदाज आयोग’ स्थापून सुभाषबाबूंना वर्ष १९४५ च्या विमान दुर्घटनेत मृत ठरवले गेले. तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांनी ‘खोसला आयोग’ स्थापून नेताजींना मृत ठरवले होते. हे सत्य मला मोठ्या बहिणीसमान असलेल्या दीदी इंदिराजींनींच सांगितले होते. श्री. लालबहादूर शास्त्री यांनीही अल्पावधीच्या सत्ताकाळात नेताजींना शोधण्याचा प्रयत्न केला; पण तो त्यांच्या मृत्यूमुळे पूर्णत्वास जाऊ शकला नाही.’
– वसंत अण्णाजी वैद्य, काटोल रोड, नागपूर. (साभार : मासिक ‘धनुर्धारी’, मार्च २००७)
ईशदर्शन आणि अखंड भारत बघणे यांची ओढ अतीतीव्रपणे लागलेले नेताजी सुभाषचंद्र बोस !वर्ष १९६२ मध्ये सुभाषबाबूंचे ज्येष्ठ बंधू श्री. शरदचंद्र बोस, मी आणि भाऊराव अशा तिघांनी ढाक्याला सुभाषबाबूंच्या एका आप्तांकडे त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना ‘आपण साधू वेशातच प्रकट होऊन पुनरपि भारतीय राजकारणात भाग घ्या’, अशी आग्रहपूर्वक विनवणी केली. ती विनवणी नाकारत त्यांनी म्हटले, ‘‘आता आपला भारत कसा का होईना स्वतंत्र झालेला आहे. या स्वातंत्र्यास्तवच ईशदर्शनाची लालसा बाजूला सारून राजकारणात भाग घेतला होता. आता मला ईशदर्शनाची ओढ अतीतीव्रपणे हिमालयाकडे ओढत आहे. त्याप्रमाणे मी हिमालयात जाणार. मला तुम्ही आनंदाने जाऊ द्या. या ईशदर्शनासह मला दुसरी ओढ अखंड भारत बघण्याचीही आहे. ईशदर्शन होताच मी त्या दृष्टीने प्रयत्नशील रहाणार आहेच. तसेच केवळ मित्र राष्ट्रांचेच (अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इत्यादींचे) नाही, तर नेहरू सरकारचेही गुप्तचर माझा शोध कसूनच घेत आहते. कानावर हेच आलेले आहे, ‘नेताजी सुभाषचंद्रांना जिथे दिसतील तिथे ठार मारा. त्यांच्यासारख्या दिसणार्या माणसाला सुद्धा सोडू नका !’ असे मरण मला नको. इच्छापूर्ती होताच मी हिमालयीन परिसरातच प्रकटपणे समाधिस्त होईन. चलतो मी.’’ रात्र होताच सुभाषबाबू आम्हा सर्वांचाच निरोप घेऊन रेल्वेस्थानकाकडे निघाले. रेल्वे सुटताच आम्ही साश्रू नयनांनी त्यांना वंदन करत त्यांचा निरोप घेतला. – वसंत अण्णाजी वैद्य |
संपादकीय भुमिकानेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूमागील षडयंत्राची माहिती सरकारने सर्वांसाठी खुली करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! |