पथकर नाक्यावरून वाहन नेलेले नसतांनाही ‘फास्टॅग’च्या खात्यामधून रक्कम वजा झाली असल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करा !
आपण आपल्या चारचाकी वाहनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यांवरून प्रवास करत असतांना आपल्याला तेथील पथकर नाक्यांवर पथकर द्यावा लागतो. हा टोल देण्यासाठी सध्या ऑनलाईन ‘फास्टॅग’ची सुविधा विविध आस्थापनांनी चालू केली आहे. (‘फास्टॅग’मुळे वाहनांना पथकर नाक्यांवर रोख रकमेने पथकर भरावा लागत नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतात. ‘फास्टॅग’च्या खात्यामधून पथकराचे पैसे ‘ऑनलाइन’ वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्या संबंधीचा एक लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) त्याच्या भ्रमणभाषवर येतो.)
बर्याच वेळा असे निदर्शनास आले आहे की, आपण आपले वाहन कोणत्याही पथकर नाक्यावरून नेलेले नसतांना अथवा त्या मार्गाने आपण गेलेलो नसतांनाही ‘फास्टॅग’च्या माध्यमातून पथकराची रक्कम आपल्या ‘फास्टॅग’च्या खात्यातून आकारली गेल्याचा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) भ्रमणभाषवर येतो. वाहनधारकांनी या लघुसंदेशाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नये. आपण जर पथकर नाक्यावरून आपले वाहन नेले नसेल, तर अशा येणार्या संदेशाकडे अथवा आपल्या खात्यातून पथकराचे पैसे आकारले गेले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. असे अपप्रकार होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आलेले आहे. अशा प्रकारे खोटे ‘फास्टॅग’ आपल्या नावावर दाखवून आपल्याशी संबंधित नसलेले वाहन एखाद्या पथकर नाक्यावरून गेल्याचे भासवले जाऊ शकते. या माध्यमातून गुन्हेगार एखादे गुन्हेगारी कृत्य करून आपण पोलिसांच्या कचाट्यात नाहक गोवले जाऊ शकतो. असा प्रकार लक्षात आल्यास त्याची तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा.
– अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद (१८.१.२०२२)