प्रजासत्ताकदिनी राजधानीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांचा चित्ररथ साकारला जाणार !
मुंबई – २६ जानेवारी या दिवशी नवी देहली येथील कर्तव्यपथावर होणार्या संचलनात महाराष्ट्रातून कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुकादेवी आणि वणी येथील श्री सप्तशृंगीदेवी या साडेतीन शक्तीपिठांच्या प्रतिकृतींचा चित्ररथ साकारला जाणार आहे. ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ असे या चित्ररथाचे नाव आहे.
‘या चित्ररथासाठी देवींच्या भव्य आणि सुंदर प्रतिमा साकारण्यात येत आहेत. यासाठी कलाकार आणि मूर्तीकार यांचा ३० जणांचा संघ कार्यरत आहे. यामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि संचालक बिभीषण चवरे अन् सहकारी यांचाही समावेश आहे. यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान अन् रोशन इंगोले मूर्तीकार आणि कलादिग्दर्शक यांनी सिद्ध केली आहे. नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे या भव्य प्रतिकृतींचे काम सांभाळत आहेत. राहुल धनसरे हे चित्ररथ महाराष्ट्रातून घेऊन जातील. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना स्त्री सामर्थ्याचे घरबसल्या दर्शन होईल’, असे सांगितले.