सातारा जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंद !
सार्वजनिक स्वच्छतागृहाला ‘बाळाजी पंत नातू’ यांचे नाव देण्याचे प्रकरण
सातारा, २१ जानेवारी (वार्ता.) – जिल्हा दंडाधिकार्यांनी ५ ते १९ जानेवारी २०२३ या कालावधीपर्यंत सातारा जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश दिले होते. असे असतांना या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१८ जानेवारी या दिवशी दुपारी १२ वाजता शिवतीर्थ (पोवई नाका) येथील नगरपालिकेने नव्याने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत जमाव जमवण्यात आला. या वेळी शौचालयावर अनधिकृतपणे ‘फ्लेक्स फलक’ लावून अनावरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने केला; मात्र पोलिसांनी जमावाला हा फ्लेक्स लावून दिला नाही.
याविषयी पोलीस हवालदार सागर मोहन निकम यांनी तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अरबाज शेख, अमोल शिंदे, असीम नगारजी, प्रकाश मोरे आणि इतर ४ जणांविरुद्ध जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला.
काय आहे प्रकरण ?
सातारा नगरपालिकेच्या वतीने शिवतीर्थावर बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाला ‘बाळाजी पंत नातू’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सातारा नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यावर कार्यवाही न झाल्यास ‘आम्ही स्वतः नामकरण करू’, अशी चेतावणीही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली होती.