महाराष्ट्र शासन देणार चाणक्यनीतीचे धडे !

  • पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती !

  • लोणावळा येथे उभारणार स्मारक !

पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) – महाराष्ट्र शासन आर्य चाणक्य यांची राजनीती, अर्थव्यवस्था, राष्ट्रहित, युद्धनीती, जीवनपद्धती आदी विविध विचारांना प्रदर्शित करणार आहे. पुणे येथील लोणावळा येथील कार्ला येथे चाणक्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी चाणक्य यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. २० जानेवारी या दिवशी मुंबई पर्यटनासाठीच्या वातानुकूलित बस आणि पर्यटन यांविषयीच्या विविध उपक्रमांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोढा यांनी वरील माहिती दिली.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘मुंबईच्या पर्यटनासाठी ११ बस सिद्ध करण्यात आल्या आहेत. पर्यटनासाठी मुंबईतील पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे निवडण्यात आली असून मार्गानुसार बसच्या फेर्‍या सोडण्यात येतील. यात मोठ्या मार्गासाठी ४०० रुपये, तर छोट्या पल्ल्याच्या मार्गासाठी २०० रुपये तिकीट असेल. या बसचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ आणि गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळक उद्यान येथे कायमस्वरूपी ‘लाईटिंग आणि साऊंड शो’ दाखवण्यात येणार आहेत. या बस येत्या १ मासात चालू होतील. यासह अन्य ३ ठिकाणी अशा प्रकारे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्थानिक लोककलाकारांनाही संधी देण्यात येणार आहे.’’

३ मासांत महाराष्ट्राला पर्यटनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आणणार !

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन विभागाच्या मालमत्तेचे सर्वेक्षणही करण्यात येणार आहे. बसस्थानके, विमानतळ, रेल्वेस्थानके येथे पर्यटनाचे आवाहन करणारी विज्ञापने लावण्यात येतील. येत्या ३ मासांत महाराष्ट्र राज्य पर्यटनामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आणू, असा विश्वास या वेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.