चंद्रपूर येथे मांसाहार खाल्ल्याने ११ विद्यार्थ्यांना विषबाधा !
चंद्रपूर – जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणार्या चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची २० जानेवारी या दिवशी सहल एके ठिकाणी गेली होती. सहलीत एकूण ५२ विद्यार्थी होते. त्यांना बॉयलर चिकन दिल्याने त्यातील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पालक रुग्णालयात आले. ‘विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असतांना याची माहिती पालकांना देणे आवश्यक होते; मात्र शिक्षकांनी ही माहिती दिली नाही’, असे पालकांचे म्हणणे आहे. ‘विद्यार्थ्यांची मांसाहार करण्याची इच्छा होती; म्हणून त्यांना चिकन दिले होते. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर ते गोल फिरणार्या पाळण्यात बसले. त्यामुळे त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. मुलांची प्रकृती आता बरी आहे’, अशी माहिती मुख्याध्यापक पेंदोर यांनी दिली.