चढावावर चालतांना ‘रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे आणि नंतर परत’ अशा नागमोडी पद्धतीने चालल्याने होणारे लाभ
‘मी अनेक वर्षांपूर्वी प्रसारासाठी नैनिताल येथे गेलो होतो. त्या वेळी कठीण चढ असलेल्या मार्गावरून त्या नगरातील कामगार पाठीवर जड ओझे घेऊन जात होते. मी त्या कामगारांना कठीण चढ सरळ न चढता नागमोडी (Zigzag) चालत चढतांना पाहिले. असे चालल्यामुळे ते लगेच थकत नसल्याचे माझ्या लक्षात आले. ते दृश्य माझ्या मनात घर करून राहिले. त्यामुळे मीही चालण्याचा व्यायाम करतांना अशा प्रकारे चालतो. ‘कठीण चढ चढतांना तसे का चालावे ?’, याची कारणे पुढे दिली आहेत.
१. सरळ चढ चालण्याने पायांच्या स्नायूंवर जेवढा ताण येतो, त्याच्या तुलनेत नागमोडी चालतांना ताण अल्प येतो. त्यामुळे चढतांना थकायला होत नाही आणि चढणे अतिशय सुलभ होते. अशा पद्धतीने चालतांना दमही लागत नाही.
२. चालण्याचा व्यायाम करतांना जागा अल्प असेल, तर चढावावर सरळ चालण्यापेक्षा नागमोडी चालल्याने चालायला अधिक जागा मिळते. अर्थात् अशा रस्त्यांवर ‘वाहनांची अत्यल्प रहदारी असेल, तरच असे चालणे संभव होते’, हे लक्षात ठेवावे.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०२२)