हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार साधना केल्यामुळे देवाची शक्ती आणि चैतन्य अनुभवता येणे अन् जीवनात आनंद मिळणे
१. मानसशास्त्राची पदवी संपादन केलेली असतांनाही जीवनातील छोट्या प्रसंगांतही स्थिर रहाता न येणे आणि निराशा येणे
‘मी मानसशास्त्राची पदवी संपादन केली असून एका माध्यमिक शाळेत शिक्षिका आहे. मला संगीताची आवड आहे. मी गायनाचे राग शिकत आहे. मी चांगले शिक्षण घेऊनही जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांत मला स्थिर रहाता येत नव्हते. बरीच वर्षे मला मूल नव्हते. नंतर मला मुलगा झाला. तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद झाला होता; पण दीड मासातच त्या मुलाचे निधन झाले. खरेतर मी अगोदरपासून मनाने अस्थिर होते. त्यात असा प्रसंग घडल्यानंतर ‘आता जगण्यात काहीच अर्थ नाही’, असे मला तीव्रतेने वाटू लागले.
२. एका संप्रदायानुसार २२ वर्षे साधना करणे, मुलाचे निधन झाल्यावर ‘देवाचे काही करू नये आणि जीवन संपवणे’, असे नकारात्मक विचार येणे
मी २२ वर्षे एका संप्रदायानुसार साधना करत होते. मुलाच्या निधनाने ‘देवाचे एवढे करूनही देवाने मला असे दुःख का दिले ? एवढे देवाचे करून तरी उपयोग काय ? त्यापेक्षा ‘देवाचे आता काहीच करायला नको आणि जीवन संपवूया’, असे विचार माझ्या मनात तीव्रतेने येऊ लागले. मला रात्रभर झोप लागत नव्हती. माझ्या जीवनात आता काहीच अर्थ नसून ‘जीवन संपवणे’, एवढाच पर्याय मला दिसत होता. या विचाराने मी रात्रभर रडत असे.
३. ‘माणसाच्या जीवनातील ८० टक्के प्रश्नांची कारणे आध्यात्मिक आणि जीवनातील ६५ टक्के घटना प्रारब्धानुसार घडत असतात’, हे धर्मशिक्षणवर्गात शिकायला मिळणे
मी नकारात्मक विचारात असतांना माझे यजमान श्री. शशिकांत पाटील हे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षण वर्गाला जाऊ लागले. त्यांना धर्मशिक्षणवर्गात चांगले ज्ञान मिळत असल्याचे जाणवले आणि त्यांनी मला धर्मशिक्षण वर्गाला येण्यास सांगितले. मला धर्मशिक्षणवर्गात शिकायला मिळाले की, आपल्या जीवनातील ८० टक्के प्रश्नांची कारणे आध्यात्मिक असतात आणि प्रत्येक व्यक्तीचे ६५ टक्के जीवन हे त्याच्या प्रारब्धानुसार ठरलेले असते. ‘जीवनात जे प्रसंग घडतात, त्यामागे काहीतरी आध्यात्मिक कारण असते. व्यक्तीच्या जीवनात येणार्या दुःखाचे कारणही आध्यात्मिक असते’, हे मला वर्गात समजले.
४. कुलदेवता आणि दत्त यांचे नामजप केल्यावर एका मासात जीवनातील नकारात्मकता न्यून होणे आणि मनाच्या स्थितीत पुष्कळ चांगले पालट होणे
धर्मशिक्षण वर्गसेवकांनी माझ्या जीवनात घडलेला प्रसंग हे पूर्वजांच्या त्रासाचे लक्षण असल्याचे सांगून यावर उपाय म्हणून मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप आणि त्याच्या जोडीला कुलदेवतेचा नामजपही करण्यास सांगितले. मी दोन्ही नामजप मनापासून करण्यास आरंभ केला. एका मासातच माझ्या मनाच्या स्थितीत पुष्कळ पालट झाले. माझ्या जीवनातील नकारात्मकता पुष्कळ न्यून होऊन माझे विचार सकारात्मक होऊ लागले.
५. धर्मशिक्षणवर्गात ‘कुलाचार म्हणून कुलदेवीची ओटी भरू शकतो’, असे सांगितल्यावर कुलदेवीने स्वप्नात येऊन ‘मी तुझी वाट बघत आहे’, असे सांगणे
मला धर्मशिक्षणवर्गात ‘कुलाचार म्हणून आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकतो’, हे समजले. त्या वेळी १० ते १२ वर्षांपूर्वीच्या प्रसंगातील ‘कलोते गावात श्री भवानीमातेचे मंदिर आहे’, असे मला कुणीतरी सांगत असल्याचे जाणवले. ओटी भरायला जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री मला स्वप्नात कुलदेवीने येऊन सांगितले, ‘मी कलोते गावात असून मी तुझी वाट पहात आहे. मी तुझ्याकडून माझी ओटी भरून घेणार आहे. तू उद्या येऊन माझी ओटी भरायची आहेस.’ त्या वेळी मी स्वप्नातच तिला ‘हो’, म्हणाले.
६. कुलदेवीनेच मंदिरात जाण्याचा मार्ग दाखवून तिची ओटी भरून घेणे
मी सकाळी उठल्यावर माझ्या यजमानांना कुलदेवीची ओटी भरण्याविषयी सांगितले. सायंकाळी ते कामावरून आल्यावर आम्ही मंदिरात जायला निघालो. आम्ही ज्या रस्त्याने निघालो तेथे पुष्कळ अंधार होता. ‘पुढे मंदिर आहे कि नाही ?’, हे कळत नव्हते. यजमान मला म्हणाले, ‘‘पुढे काही नाही. आपण मागे जाऊया.’’ पण माझी आई (कुलदेवी) मला ‘तू पुढे ये, मी आहे’, असे सांगत होती. आम्ही जसे पुढे गेलो, तसे आम्हाला देवीचे मंदिर दिसले. देवीच्या मंदिरात केवळ दिवा होता. ‘जणूकाही देवीच माझी वाट पहात आहे’, असे मला जाणवले. माझ्या यजमानांना देवीचे मुख पुष्कळ वेगळे दिसले. ‘मी देवीची ओटी भरल्यावर देवीच्या मुखावर एक वेगळेच हास्य दिसत होते आणि देवीला पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला जाणवले.
७. कुलाचार पालनाने देवीचे प्रेम मिळणे आणि प्रत्यक्ष आई भेटल्याची जाणीव होऊन भावजागृती होणे
ज्या मंदिरात मी माझ्या कुलदेवीची ओटी भरली, ते मंदिर त्या वेळेत बंद असते; पण आम्ही गेलो त्या दिवशी ते उघडे होते. हा माझ्यासाठी चमत्कार होता; कारण माझी कुलदेवता माझी वाट पहात होती. मी कुलदेवीची ओटी भरल्यानंतर माझा भाव जागृत झाला. जणूकाही ‘मी माझ्या आईलाच प्रत्यक्ष भेटत असून तिने मला तिच्या कुशीत घेतले आहे’, असे मला जाणवत होते. मी दोन दिवस त्या भावस्थितीत होते. त्या वेळी मला ‘कुलदेवीच आपल्या कुळाची आई आहे’, हे प्रकर्षाने जाणवले. ‘आता मला माझी आई मिळाली’, असे वाटले. ‘एका कुलाचार पालनाने एवढा आनंद मिळतो’, हे माझ्यासाठी आश्चर्यजनक होते.
८. मानसपूजा केल्यावर कुलदेवी सतत स्वतःजवळ असल्याचे वाटून एकटेपणाची भीती दूर होणे
धर्मशिक्षणवर्गात ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हे सूत्र शिकवून ‘आपण देवीची मानसपूजा आणि मानस ओटी भरू शकतो’, असे आम्हाला सांगितले. त्याप्रमाणे मी कुलदेवीची मानस ओटी भरल्यावर ‘कुलदेवी सतत माझ्या जवळच आहे’, असे मला वाटू लागले. मानसपूजेमुळे माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले. ‘पूर्वी मला मी एकटीच आहे’, असे वाटत होते; पण आता मला ‘मी एकटी नसून माझी आई, म्हणजेच कुलदेवी माझ्या समवेतच आहे’, याची जाणीव होते आणि मला वाटत असलेली भीती न्यून होते.
९. धर्मशिक्षणवर्गात धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून त्याप्रमाणे कृती केल्याने आनंद अनुभवता येणे
मला धर्मशिक्षणवर्गात ‘प्रत्येक धार्मिक कृती का आणि कशी करावी ?’, यामागील शास्त्र कळले. यातून मला ‘जीवनातील लहान लहान धार्मिक कृती अध्यात्मशास्त्र समजून घेऊन करण्यात किती आनंद आहे !’, ते अनुभवता आले.
१०. एका साधनामार्गानुसार साधना करतांना त्यामध्ये हिंदूंचे कोणतेही सण आणि उत्सव साजरे न करणे
पूर्वी मी ज्या साधनामार्गानुसार साधना करत होते, त्यामध्ये ‘आपल्याला जे सांगितले जाते, तेवढेच सत्य आहे. त्याविना दुसरे काहीच सत्य नाही’, असे सांगितले जायचे. त्यामुळे आम्ही मागील २० वर्षांत हिंदु धर्मातील कोणतेच सण आणि उत्सव घरी साजरे केले नाहीत. ‘हे सर्व करणे म्हणजे अंधश्रद्धा आहे. आपला वेळ आणि पैसे फुकट घालवणे आहे’, असे आम्हाला सांगितले जात होते. त्यामुळे आजपर्यंत मी वास्तुशुद्धी करत नव्हते कि कोणत्याही मंदिरात जात नव्हते.
११. गुरुकृपेने योग्य साधनामार्ग मिळून देवाची शक्ती आणि चैतन्य अनुभवणे
धर्मशिक्षण वर्गाला जोडल्यापासून ‘प्रत्येक सण का करावा ? त्यामागील अध्यात्मशास्त्र काय आणि ते शास्त्राप्रमाणे केल्याने देवतांची शक्ती अन् चैतन्य कसे मिळते ?’, हे मला शिकायला मिळाले. त्याप्रमाणे मी आता प्रत्येक सण आणि उत्सव यांचे अध्यात्मशास्त्र समजून पुढीलप्रमाणे कृती करत असून मला त्यातील चैतन्य अनुभवता येत आहे.
११ अ. दत्तजयंतीला भगवान दत्तात्रेयाचे चैतन्य अनुभवता येणे : आतापर्र्यंत मी दत्ताच्या मंदिरात कधीच गेले नव्हते; पण वर्गाला जाऊ लागल्यापासून मी दत्तजयंतीला दत्ताच्या मंदिरात गेले. तिथे प्रदक्षिणा घातल्या. दिवसभर दत्ताचा नामजप केला. त्यामुळे मला त्या दिवशी चैतन्य आणि आनंद अनुभवता आले, तसेच ‘मी इतकी वर्षे या चैतन्यापासून वंचित राहिले’, याची मला जाणीव झाली.
११ आ. शास्त्राप्रमाणे मकरसंक्रांत सण साजरा केल्यावर प्रत्येक सणाच्या महत्त्वाची तीव्र जाणीव होणे : मागील २० वर्षांत मी घरी कधीच संक्रांत साजरी केली नव्हती; पण मी शास्त्र समजून मकरसंक्रांतीचा सण साजरा केला, तेव्हा मला छान वाटले आणि त्यातील आनंद अनुभवता आला. तसेच ‘आपले प्रत्येक सण साजरे करणे किती आवश्यक आहे ?’, याची मला तीव्र जाणीव झाली.
११ इ. महाशिवरात्रीला शास्त्रानुसार भगवान शिवाचे दर्शन घेऊन आनंद मिळणे : महाशिवरात्रीला मी शिवाच्या मंदिरात जाऊन वर्गात शिकवल्याप्रमाणे प्रथम शृंगदर्शन आणि शिवपिंडीचे दर्शन घेऊन सर्व कृती केल्या. प्रत्यक्ष कृती केल्याने मला त्यातून आनंद मिळाला.
१२. धर्मशिक्षणाच्या अभावी लाखो हिंदू या चैतन्यदायी ज्ञानापासून वंचित राहिल्याची जाणीव होऊन प्रत्येकाला अध्यात्मशास्त्र सांगण्याचा प्रयत्न करणे
स्वातंत्र्यापासून आतापर्यंत गेली ७५ वर्षे हिंदूंना कुणीच धर्मशिक्षण दिले नाही. त्यामुळे ‘लाखो हिंदू या चैतन्यदायी ज्ञानापासून वंचित राहिले’, याची मला जाणीव झाली. ‘धर्मशिक्षणामुळे मी जशी आनंदी झाले, तसा प्रत्येक हिंदु आनंदी व्हायला हवा’, असे मला तीव्रतेने वाटू लागले. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू ईश्वरी चैतन्यापासून वंचित रहात आहेत. त्या सर्वांनाच ईश्वरी चैतन्य मिळावे, यासाठी मला जे धर्मशिक्षण मिळाले, ते मी इतरांना सांगत आहे. त्यामुळे अनेकांना आनंदाची अनुभूती येत असून मला फार छान वाटत आहे. आता मी समष्टी साधना म्हणून अध्यात्मप्रसार करण्याचे ठरवले आहे. ‘देवच माझ्याकडून हे सर्व करून घेणार आहे’, असे मला वाटत आहे.’
– सौ. स्नेहल पाटील, खोपोली, रायगड. (९.७.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |