तुळजापूर पोलिसांनी केली महंतांची साडेचार घंटे चौकशी !
श्री तुळजाभवानी देवीचे मौल्यवान अलंकार आणि नाणी गायब झाल्याचे प्रकरण
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मातेचे ऐतिहासिक पुरातन मौल्यवान सोन्या-चांदीचे अलंकार आणि नाणी गायब झाल्याच्या प्रकरणी २० जानेवारी या दिवशी मंदिरातील जमादारखान्यात महंत चिलोजीबुवांची ‘इन कॅमेरा’ चौकशी करण्यात आली. या वेळी मंदिर संस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दुपारी २.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या चौकशीत पोलिसांना काहीच निष्पन्न झाले नसल्याने पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. अपहार झाला, त्या काळात महंत चिलोजीबुवा यांच्याकडे जमादारखान्याचे दायित्व होते; म्हणून त्यांची चौकशी करण्यात आली.
(सौजन्य : Awaaz Maharashtracha)
काय आहे प्रकरण ?
सप्टेंबर २०२० मध्ये श्री तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यातील ३५ तोळे सोने, ७१ किलो चांदी आणि ७१ प्राचीन नाणी पळवल्याच्या प्रकरणी तत्कालीन धार्मिक व्यवस्थपक दिलीप नाईकवाडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तुळजाभवानी देवीला अनेक प्रतिष्ठितांनी अर्पण केलेले बहुतांश मौल्यवान आणि प्राचीन दागिने तिजोरीतून गायब करून अपव्यवहार केल्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या ३ सदस्यीय चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यात नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवत सोने-चांदीच्या दागिन्यात काळाबाजार झाल्याचे शिक्कामोर्तब केले होते. प्राचीन नाण्यांची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या ‘रेकॉर्ड’मध्ये वर्ष १९८० पर्यंत होती; मात्र वर्ष २००५ आणि वर्ष २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या-चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते.
हे पण वाचा –
श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचा देवनिधी लुटणार्यांवर त्वरित गुन्हे दाखल करा !