सिंधुदुर्ग : मळगाव येथे २५ युवक-युवतींना घेऊन जाणारा कंटेनर ग्रामस्थांनी पकडला !
|
सावंतवाडी – २० ते २५ युवक-युवती यांना घेऊन जाणारा एक बंदिस्त कंटेनर ग्रामस्थांनी मळगाव येथे पकडला. पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी आणि सत्य शोधून काढावे, तसेच यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का ? याची चौकशी करावी. कंटनेर चालकावर गुन्हा नोंद करावा, तसेच या युवक-युवतींना नेणार्या संबंधितांची चौकशी करावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.
मळगाव येथील अरूंद रस्त्यावरून हा कंटेनर जात असतांना काहींना आतून वेगवेगळे आवाज ऐकू आले. त्यामुळे ग्रामस्थांनी कंटेनरला थांबवून चालकाला कंटेनर उघडण्यास सांगितले. तेव्हा कंटेनरमध्ये २० ते २५ युवक आणि युवती असल्याचे उघड झाले. या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी या युवक-युवतींना नेण्यात येत होते.
‘कंटेनरमधील युवक आणि युवती एका विवाह सोहळ्यातील खानपान व्यवस्था बघण्यासाठी (कॅटरिंगसाठी) आली होती. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवून सोडून देण्यात आले’, असे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
या प्रकरणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी एका ‘न्यूज पोर्टल’ला प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, हा अमानुष प्रकार आहे. कंटेनरमधून बाहेर काढल्यानंतर अनेकांना उलट्या झाल्या. त्यांना गुदमरल्यासारखे झाले होते. या प्रकरणात एका स्थानिक व्यक्तीचा हात असून तिच्याविरोधात मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटनेच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करणार आहे.