रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात कन्नड भाषेतील ‘उद्योगपती साधना शिबिरा’ला आरंभ !
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेच्या वतीने येथील सनातनच्या आश्रमात २० जानेवारी या दिवशी कन्नड भाषेतील उद्योगपती साधना शिबिराला चैतन्यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सुरतकल, दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील उद्योगपती श्री. एम्.जे. शेट्टी आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या शिबिरात कर्नाटक राज्यातील उद्योगपती सहभागी झाले आहेत.
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याचा परिचय हिंदु जनजागृती समितीचे श्री. शरद कुमार आणि श्री. चन्द्र मोगेर यांनी करून दिला. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हे विषय श्री. गुरुप्रसाद गौडा अन् समितीचे श्री. अरुण कुलकर्णी यांनी मांडले.