हिंदु धर्माचे तुकडे करून त्यातून ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडत असतील, तर रस्त्यावर उतरलेच पाहिजे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप
जेजुरी (पुणे) येथील ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’मध्ये सहस्रो हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग
जेजुरी (जिल्हा पुणे) – हिंदु धर्म कुणाच्या विरोधात नाही; पण धर्माचे तुकडे करून त्यातून ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना घडत असतील, तर रस्त्यावर उतरलेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवशाहीतील पुढील राजे, सरदार मोगलांच्या विरोधात लढले; पण त्यांनी दुसर्या धर्माच्या विरोधात काही केले नाही; मात्र अफझलखान आणि त्याचे साथीदार यांनी हिंदूंंची मंदिरे तोडून युद्ध केले. आपण आपल्या देवधर्माच्या रक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या या विरोधात कायद्यात पालट करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू. आपली एकजूट कायम ठेवा, हिंदु समाजाची ताकद वाढली पाहिजे, असे परखड प्रतिपादन भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. जेजुरी येथे १९ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्या’त ते बोलत होते.
या मोर्च्याच्या समारोपाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ‘हलाल जिहाद ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.
आमदार शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, कुणीही उठायचे आणि आपला इतिहास कसाही तोडायचा-मोडायचा, एखादे वक्तव्य करायचे, सध्या ही ‘फॅशन’ झाली आहे; पण यातून समाजात तेढ निर्माण होते. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सर्वांनी उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत हे हिंदु राष्ट्रच आहे आणि या हिंदु राष्ट्रात हिंदूंवर होणारा अन्याय सहन करणार नाही ! – विक्रम पावसकर, किल्ले संवर्धन समिती
या वेळी किल्ले संवर्धन समितीचे विक्रम पावसकर म्हणाले की, हिंदु समाजातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादसारखे प्रकार घडत आहेत. मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मीय यांच्याकडून हिंदु धर्मियांचे धर्मांतर होत आहे. या विरोधात सर्वांनी कठोर भूमिका घ्यावी. मुलींसाठी संस्कारवर्ग चालू करावा. भारत हे हिंदु राष्ट्रच आहे आणि या हिंदु राष्ट्रात हिंदूंवर होणारा अन्याय सहन करणार नाही.