नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर चक्र’ पुरस्कारांनी सन्मान करावा ! – जय हिंद सैनिक संस्था
मुंबई, २० जानेवारी (वार्ता.) – १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांप्रमाणे आझाद हिंद सेनेच्या २६ सहस्र हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ देहलीतील लाल किल्ल्यावर २१ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात यावा. मरणोत्तर ‘भारतरत्न’ आणि ‘परमवीर’ पुरस्कार देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान करावा, अशी मागणी ‘जय हिंद सैनिक संस्थे’चे महासचिव जनार्दन जंगले यांनी २० जानेवारी या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
जय हिंद सैनिक संस्थेचे प्रथम अधिवेशन २३ जानेवारी या दिवशी दादर (पूर्व) येथील स्वामीनारायण मंदिरातील योगी सभागृहात सकाळी ९ वाजता चालू होणार आहे. याविषयी जय हिंद सैनिक संस्थेच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती दिली. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतीकार्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आमच्या संस्थेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावर राज्यपालांनी शासनाला पत्र पाठवले असल्याची माहिती जय हिंद सैनिक संस्थेकडून देण्यात आली.