सप्तपदीतील शेवटचे अन् सर्वोच्च पद : एकमेकांशी आत्मसख्य करणे
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करून ‘सप्तपदी’ या लेखमालेचा अखेरचा भाग येथे देत आहोत.
सप्तपदीतील शेवटचे पद म्हणजे गृहस्थ जीवनाचे सार !
भर्तृ: भ्रातृपितृव्यैश्च श्वश्रूश्वशुरदेवरैः ।
पुत्रैश्च पूजनीया स्त्री भूषणाच्छादनाशनै: ॥ – वसिष्ठस्मृति, अध्याय ५, श्लोक १८
अर्थ : पती, भाऊ, काका सासू- सासरे, दीर आणि पुत्र यांनी वस्त्र, अलंकार, भोजन आदींनी स्त्रियांची सदैव सेवा-पूजन करणे आवश्यक आहे.
महर्षि वसिष्ठ सांगत आहेत की, स्त्री ही समादरणीय (समान आदरयुक्तच) आणि रक्षणीय आहे. पती, भाऊ, काका सासू- सासरे, दीर आणि पुत्र यांनी वस्त्र, अलंकार, भोजन आदींनी स्त्रियांची सदैव सेवा-पूजन करणे आवश्यक आहे. (स्त्रियांचा छळ करा, हुंड्यासाठी मारहाण करा, अपमान करा, अशी शिकवण धर्मशास्त्रात दिली नाही.)
सातवे पद हे फार महत्त्वाचे आहे. सर्वोच्च आणि श्रेष्ठ मागणी हे पद करत आहे. गृहस्थ जीवनाचे सार या शेवटच्या पदात आले आहे.
सखा सप्तपदी भव ।
अर्थ : ‘तू माझ्या समवेत ७ पावले चाललीस, तुझे माझे आत्मसख्य होऊ दे.’
‘सखा’ या शब्दाची व्याख्या ‘समाना ख्याति: यस्य स: ।’ म्हणजे ‘ज्याची ख्याती आपल्यासारखी असते, तो ‘सखा’. ख्यातीसमान असणे म्हणजे काय ? ते सांगतो.
चंद्र तेथे चंद्रिका । शंभुु तेथे अंबिका ।
संत तिथे विवेका । असणे कि जे ॥
अर्थ : चंद्र आहे तेथे चांदणे असणारच आणि शिव आहे तेथे शक्ती असतेच; त्याचप्रमाणे जेथे संत आहेत तेथे सद़्सद्विवेक जागृत असतोच.
आपण यांची एकमेकांखेरीज कल्पनाच करू शकत नाही, एवढे यांचे ‘सख्य’ आहे. ‘असेच आपले सख्य होवो’, ही उदात्त कामना या पदात केली आहे. सीता-राम, राधा-कृष्ण, उमा-महेश्वर, रति-मदन, लक्ष्मी-नारायण अशी आपली उपासनेची परंपराच आहे. आपल्या देवता या युग्मच (जोडी) आहेत. प्रकृति आणि पुरुष या दोघांच्या संयोगानेच सृष्टीची रचना ब्रह्मदेवांनी केली आहे. हे दोन्ही अभेद्य आहेत. आपणही असेच अभेद्य होऊ. दुधात साखर विरघळल्यानंतर केवळ ‘माधुर्य’च निर्माण होते. त्याचप्रमाणे आपले ‘सख्य’ होऊ दे.
आपल्याकडे युग्मांची एक गंमत आहे. तो ‘दिवस’ आहे आणि ती ‘रात्र’ आहे. यांचा जेव्हा संयोग होतो, तो काळ (पहाट आणि सायंकाळ) फारच सुंदर असतो. ‘तो’ जप असतो आणि ‘ती’ जपमाला असते. यांचा संयोगही फार सुंदर असतो. (हा संयोग असतो. तो पाहू नये; म्हणूनच जपमाळेवर आच्छादन (गोमुखी) करतात.) ‘तो’ यज्ञ असतो आणि ‘ती’ आहुती असते. ‘तो’ सागर असतो आणि ‘ती’ नदी असते.
वरील उदाहरणात अभेद्य युग्म आहे. ‘दिवसाचे महत्त्व रात्रीमुळे कळते. त्याचप्रमाणे आपण उभयतांचे सख्य घडू दे, परस्परांच्या सहकार्याने आपला उत्कर्ष घडू दे’, ही लक्ष्मी-नारायणाच्या चरणी प्रार्थना करू. ‘द्वैताने भरलेल्या या जगात आपले ‘अद्वैत’ घडू दे’, ही सदिच्छा यात आहे.
हे वाचल्यानंतर ‘आपला धर्म स्त्रियांना मान देत नाही. समान वागणूक देत नाही’, असे आपण तरी म्हणू नका. ‘तू माझी ‘सखी’ हो एवढा उदात्त विचार आपल्या ऋषिमुनींनी दिला आहे. तो आचरावा’, ही प्रार्थना. ‘आम्ही’ या शब्दात ‘मी’ हे अक्षर येते; परंतु ‘मी’मध्ये ‘आम्ही’ येत नाही. तेव्हा मीपणा सोडून आम्ही बनून प्रारंभ करूया.’
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग (६.१२.२०२२)