रामनाथी आश्रमात झालेल्या मराठी भाषिक साधना शिबिरातील शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती
२२ ते २४.११.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात ‘मराठी भाषिक साधना शिबिर’ झाले. त्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सौ. प्रियांका पांडुरंग सावंत, ठाणे
१. डोळे मिटून नामजप करतांना श्रीकृष्णाचे डोळे सजीव असून ‘तो माझ्याकडे पहात आहे’, असे जाणवणे : ‘शिबिरामध्ये आम्हाला १५ मिनिटे डोळे मिटून नामजप करायला सांगितला होता. मला नामजप करतांना श्रीकृष्णाचे डोळे सजीव दिसून ‘तो माझ्याकडे पहात आहे’, असे वाटले. त्यामुळे मी भारावून गेले.
२. विविध रंग आणि श्रीकृष्णाच्या बाजूला वर्तुळाकार प्रभा पसरत असल्याचे दिसणे : नंतर मला भगवा, पांढरा, गुलाबी, निळा असे रंग दिसून ‘श्रीकृष्णाच्या बाजूला वर्तुळाकार प्रभा पसरत असून मी त्यात आत-आत पहात आहे’, असे मला जाणवले. मी त्यात हरवून गेले. मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. नंतर आम्हाला डोळे उघडायला सांगितल्यावर मी त्या जाणिवेतून लवकर बाहेर येऊ शकले नाही.’
३. पंचमहाभूतांसाठी यज्ञ चालू असतांना ‘तेज’ या महाभूतासाठी हवन चालू असतांना सूर्याची मानसपूजा केल्यावर तळहात पुष्कळ गरम होणे : आश्रमात पंचमहाभूतांसाठी यज्ञ होता. ‘तेज’ या महाभूतासाठी हवन चालू असतांना मी हात जोडून सूर्यनारायणाची मानसपूजा केली. पूजा संपल्यावर मी जोडलेले हात सोडले आणि माझ्या मुखावर फिरवले. तेव्हा ‘माझे दोन्ही हात, हातांत अग्नी ठेवल्यासारखे पुष्कळ गरम झाले होते’, असे माझ्या लक्षात आले. मी माझा हात माझ्या मैत्रिणीच्या तळहाताला लावल्यावर ती चटका लागल्यासारखे ओरडली.
श्री. हेमंत नारायण तुलित, गोवा
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना पहातांना श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन होऊन पुष्कळ आनंद होणे आणि नंतर ‘स्वतः हवेत तरंगत आहे’, असे जाणवणे : ‘शिबिराच्या समारोपाच्या वेळी सायंकाळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे आगमन झाले. तेव्हा ‘लक्ष्मी हळूवार पावलाने कशी येते’, हे मला समजले. माझ्या शरिरावर रोमांच आले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आनंदी अन् प्रसन्न तोंडवळा पहातांना मला बराच वेळ आनंद होत होता. मला व्यासपिठावर श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. नंतर ‘मी बराच वेळ हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवत होते.’
सौ. ज्योती दीपक मुळ्ये, रत्नागिरी
१. ‘संध्याकाळच्या सत्रात श्री. नागेश गाडे बोलत असतांना मला त्यांचा चेहरा पिवळसर रंगाचा दिसला.
२. आम्हाला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाची माहिती सांगण्यात आली. आमच्या समोरच्या पडद्यावर ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून भारतीय संगीत चालू झाल्यावर ‘गोमूत्र पिऊन त्यावर पाणी प्यायल्यावर तोंडात जसा गोडवा येतो’, तसा गोडवा माझ्या तोंडात आला.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
कु. प्रज्ञा दुखंडे, मुंबई
शिबिराच्या पहिल्या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले चालत येत आहेत’, असा भास होणे : ‘शिबिराच्या पहिल्याच दिवशी आश्रमात प्रवेश करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले चालत येत आहेत’, असा मला भास झाला. त्याच दिवशी दुपारच्या महाप्रसादाच्या वेळी आणि आश्रमात एके ठिकाणी जातांना पुन्हा मला ‘गुरुदेव समोर आहेत’, असा भास झाला. त्या वेळी ‘हे सत्य आहे कि भास आहे ?’ हे मला कळत नव्हते.
श्री. प्रशांत राजेंद्र सरवदे, सोलापूर
१. ‘आश्रम पाहून मला स्वर्गात आल्यासारखे वाटले. ‘रामराज्य कसे असणार आहे ?’, हे मला अनुभवायला आले. मला चांगले वाटले.
२. ‘सूक्ष्मातून आक्रमणे कशी होतात ?’, हे पहायला मिळाले.
३. येथील आनंददायी लहरींमुळे मला आनंद होत होता.’
श्री. प्रशांत कृष्णा सरवदे, डोंबिवली पश्चिम, ठाणे.
१. आश्रमातील वातावरण चैतन्याने भरलेले, आध्यात्मिक, शांत अन् तेजस्वी आहे. आश्रमाच्या कणाकणात सकारात्मक शक्ती वास करत आहे. साधकांची वागणूक प्रेमळ आहे. या वातावरणामुळे साधना करण्याची आणि साधनामय जीवन जगण्याची स्फूर्ती मिळते.
२. ‘नकारात्मक शक्ती कशा त्रास देतात ?’, याचे ज्ञान झाले.’
श्री. विजय वामन जोशी, डोंबिवली पूर्व, ठाणे.
‘आश्रम पाहून माझे मन शांत झाले. नम्रता असलेले साधक आणि त्यांनी केलेले आदरातिथ्य बघून मी अवाक् झालो. सर्वच अवर्णनीय आहे. आश्रमात असतांना ‘मी वेगळ्याच जगात आहे’, असे मला वाटले. माझी मती गुंग झाली. ‘हा वैकुंठ असावा’, असेही मला वाटले.’ (आश्रमातील बागेत रुद्राक्ष आणि चंदन यांची रोपे नसल्यास ती मी देऊ शकेन.)
श्री. विक्रम भगवंत निंबाळकर, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
१. ‘आश्रम पाहून मला ‘हिंदु राज्य (रामराज्य) याचा आरंभ रामनाथी आश्रमातून झाला आहे’, असे वाटले. मी ते प्रत्यक्ष अनुभवले.
२. रामनाथी आश्रमात ठायीठायी सात्त्विकता आणि चैतन्य असून ‘परात्पर गुरुदेवांचा आश्रमात सर्वत्र सूक्ष्म रूपात वास आहे’, असे मला जाणवले.’
कु. मृण्मयी महेश सरवटे, डोंबिवली (पश्चिम), ठाणे.
१. ‘रामनाथी आश्रमात असतांना गोकुळात असल्याचा अनुभव येतो.
२. येथे असतांना कुठलेही वाईट विचार मनात येत नाहीत.
३. आश्रमातील संशोधन अद्वितीय आहे.’
श्री. राजेश नारायण मंगळवेढेकर, सोलापूर
१. ‘मी स्वर्गात आलो आहे’, असे मला वाटले.
२. या जगात देव आहे, तशा अनिष्ट शक्तीसुद्धा आहेत. सद्यःस्थितीत ‘नामजप आणि साधना करणे’, ही काळाची आवश्यकता आहे. त्याला पर्याय नाही’, हे माझ्या लक्षात आले.’
कु. अनुराधा ल. बेरड, परेवाडी, जि. नगर.
१. ‘रामनाथी आश्रम पाहून मला चैतन्याची अनुभूती आली आणि परात्पर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या सत्ययुगाचा, म्हणजे ‘रामराज्य’ कसे असेल ?’, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
२. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘अनिष्ट शक्तींविषयी जे ऐकले होते, ते किती भयानक असते’, याची अनुभूती आली आणि ‘परात्पर गुरुदेव आपल्यासाठी किती करतात ?’, याची जाणीव आली.’
सौ. गीता पै, डोंबिवली, ठाणे.
‘सूक्ष्म जगताविषयी प्रदर्शन पाहून पूर्वी कधी ऐकलेल्या किंवा वाचनात आलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहून मला पुष्कळच आश्चर्य वाटले. ‘आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात’, याची मला जाणीव झाली.’
सौ. विजया ढोले, घाटकोपर, मुंबई.
‘चांगल्या, तसेच अनिष्ट शक्तीही आपल्या सभोवती असतात. ‘अनिष्ट शक्तींचा परिणाम केवळ माणसांवरच नाही, तर निर्जीव वस्तूंवरही होतो’, हे समजले.
श्री. दीपक मुळ्ये, रत्नागिरी
‘रामनाथी आश्रम अत्यंत पवित्र वाटला. ‘येथे प्रत्यक्ष परमेश्वरी तत्त्वाचा वास आहे’, याची मला अनुभूती आली. परमेश्वराला अपेक्षित असे सर्व कार्य आणि प्रत्यक्ष कृती सर्व साधकांकडून होत आहेत.’
श्री. मिलींद बापू पांचाळ, कुणकवळे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
‘शिबिरातील या ३ दिवसांत मला मिळालेले आध्यात्मिक ज्ञान हे जीवनात अमूलाग्र पालट घडवणारे आहे.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २३.११.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
अनिष्ट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |